स्थैर्य, सातारा, दि. १९ : पुनवडी ( ता. जावली ) येथील करोना बाधितांच्या संख्या दररोज वाढत असून ही साखळी खंडीत करण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर परिश्रम घेत आहे . तर काल रात्री उशिरा आलेल्या अहवालात 22 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून येथील एकूण बाधितांची संख्या 113 झाली आहे .
पुनवडी गावची मूळ लोकसंख्या 591 असून यामध्ये 138 मुंबईकर संख्या अशी एकूण 729 लोकसंख्येपैकी आतापर्यंत 379 जणांचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत . तर आज पुनवडी येथे 101 तर भणंग येथे 148 जणांचे स्वॅब घेण्यासाठी आरोग्य विभागाने मोठी यत्रंणा उभी केली . यामध्ये वैद्यकिय अधिकारी , कर्मचारी यांच्यासह 102 व 108 या वाहनांसह एस टी बसची वाहतुकीसाठी मदत घ्यावी लागली . अशी माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ . भगवान मोहिते यांनी दिली .
जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते मेढा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक निळकंठ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली केळघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ . साधना कंवारे, आरोग्य सहाय्यक सतीश मेढेकर, विशाल रेळेकर, आरोग्य सेवक मोहन शिंदे, अरविंद सोमवंशी, आरोग्य सेविका अस्मा शेख, तलाठी संदीप ढाकणे, ग्रामसेवक यादव यांच्यासह आशा वर्कर, अगंणवाडी सेविका, आरोग्य विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती, परिसरातील कर्मचारी संयुक्तपणे विविध उपाययोजना करत दररोज घरोघरी फिरून माहिती घेत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी परिश्रम घेत आहेत . तर केळघरचे सरपंच रविंद्र सल्लक, व्यवसायिक संतोष कासुर्डे, प्रमोद शिर्के यांनी पीपीई किट घालून पुनवडी येथील बाधित घरात सोडियम हायप्रो ऑक्साईड या जंतू नाशकाची फवारणी करत सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून या गावातील नागरिकाना मदतीबरोबरच दिलासा देण्यासाठी सामाजिक घटकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. तर आज सकाळी संबधित नागरिकांना आणण्यासाठी दोन एस टी बस पुनवडी येथे गेल्या होत्या. त्या त्यांना घेऊन केळघर येथे आल्यावर संबधित चालकांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून देण्यात आलेली पीपीई किट घेऊन तशीच शेजारी ठेवून देत गाडी भणंगला नाही. हा निष्काळजीपणा त्यांच्या जीवावर बेतू शकतो. अशी चर्चा पाहणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली.