फलटणमधील साखर कारखान्यांना ३ दिवसांचा अल्टीमेटम; ऊसाला ३५०० दर द्या, अन्यथा संघर्ष अटळ – स्वाभिमानी शेतकरी संघटना


सन २०२५-२६ च्या हंगामासाठी ऊसाला प्रति टन ३५०० रुपये पहिली उचल जाहीर करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. फलटणमधील कारखान्यांना ३ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला असून, अन्यथा ‘काटा बंद’ आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०९ डिसेंबर : सन २०२५-२६ चा ऊस गळीत हंगाम सुरू होऊन महिना उलटला तरी फलटण तालुक्यातील साखर कारखान्यांनी अद्याप ऊसाची पहिली उचल (FRP) जाहीर केलेली नाही. या कारभाराविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, येत्या तीन दिवसांत प्रति टन ३५०० रुपये दर जाहीर न केल्यास कारखान्यांवर ‘काटा बंद’ आंदोलन करण्यात येईल, असा खणखणीत इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यासंदर्भातील निवेदन तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांना देण्यात आले आहे.

महिना झाला तरी दर गुलदस्त्यात

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गळीत हंगाम सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. वास्तविक, गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊस दर जाहीर करणे बंधनकारक होते. मात्र, कारखानदारांनी अद्यापही मौन बाळगले आहे. सातारा जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांनी ३५०० रुपये प्रति टन दर जाहीर केला आहे, त्याप्रमाणेच फलटणमधील कारखान्यांनीही दर द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

तीन दिवसांचा अल्टीमेटम

“शेतकऱ्यांची सहनशीलता पाहू नका. येत्या तीन दिवसांत ३५०० रुपये पहिली उचल जाहीर करून ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावीत. जर या मागणीची दखल घेतली नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि शेतकरी मिळून कारखान्यांचे वजन काटे बंद पाडतील (काटा बंद आंदोलन),” असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. तसेच, या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी साखर कारखाना प्रशासन आणि फलटण तालुका प्रशासनाची राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या पदाधिकाऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या

या मागण्यांचे निवेदन देताना सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र घाडगे, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, फलटण शहर संघटक किसन शिंदे, युवक राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, साखरवाडी विभाग प्रमुख किरण भोसले, पक्ष अध्यक्ष (तालुका) दादा जाधव, विकास जाधव, राहुल घाडगे, तेजसिंह जाधव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!