दैनिक स्थैर्य | दि. ६ जून २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींना सातारा जिल्हा परिषदेकडून १३ जुलै २०२२ च्या पत्रान्वये ‘स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी’ योजनेंतर्गत ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली होती; परंतु या बांधकामांना स्थगिती आली होती. ही बाब खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गांभीर्याने घेऊन त्यांनी १५ नोव्हेंबर २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही स्थगिती उठविण्याबाबत विनंती केली होती. ही विनंती मान्य करून मुख्यमंत्री शिंदे यांनी ही स्थगिती उठविली असून सातारा जिल्हा परिषदेने २९ मे २०२३ रोजी गटविकास अधिकार्यांना पत्र लिहून या ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी मंजुरी मिळालेली फलटण तालुक्यातील गावे अशी :
घाडगेवाडी, बोडकेवाडी, कांबळेश्वर, ताथवडा, राजाळे, निंभोरे, टाकळवाडा, शेरेचीवाडी (ढवळ), मानेवाडी.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांमुळे वरील गावांच्या ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी स्थगिती उठल्याने खा. निंबाळकर यांचे या गावांनी आभार मानले आहेत.