स्थैर्य, मुंबई, दि.२८: अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज अँगलच्या चौकशीत बाॅलीवूडमधील स्टार्सवर कारवाई सुरूच आहे. शनिवारी अटक करण्यात आलेला धर्मा प्राॅडक्शन्सचा माजी सहायक दिग्दर्शक आणि कार्यकारी निर्माता क्षितिज रविप्रसादला अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) रविवारी दंडाधिकाऱ्यांसमोर आॅनलाइन पद्धतीने हजर केले. त्याला ३ आॅक्टोबरपर्यंत कोठडीत पाठवण्यात आले आहे.
एनसीबीचे अधिकारी मुरारी लाल यांनी कोर्टाला सांगितले की, ‘अटक करण्यात आलेला दलाल संकेत पटेल याने आधी क्षितिजला दुसरा आरोपी करमजितसिंह आनंद याच्या माध्यमातून गांजा पुरवला होता. साडेतीन हजार रुपये किमतीचा ५० ग्रॅम गांजा १२ वेळा पुरवण्यात आला. एकूण ६०० ग्रॅम गांजाचे ४२ हजार रुपये वसूल करण्यात आले. त्यामुळे क्षितिजकडून आणखी माहिती मिळवण्यासाठी क्षितिजला ९ दिवसांची कोठडी द्यावी.’ मात्र, कोर्टाने क्षितिजला फक्त ६ दिवसांचीच कोठडी दिली. दरम्यान, एनसीबीने शनिवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, करिश्मा प्रकाश, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची चौकशी केल्यानंतर या सर्वांचे मोबाइल फोन जप्त केले, त्यात दीपिकाच्या दोन फोनचा समावेश आहे, असा दावा माध्यमांतील सूत्रांनी दिलेल्या वृत्तात करण्यात आला आहे.
आतापर्यंत २० जणांना अटक, १८ जण बाॅलिवूडमधील
सुशांत आत्महत्या प्रकरणानंतर या सर्व घटनाक्रमाला वेगळे वळण लागले. अचानक या प्रकरणात मादक पदार्थांच्या व्यसनापासून त्याच्या खरेदी-विक्रीपर्यंतचे धागेदोरे जोडले गेले आणि एनसीबी कसून तपास करत आतापर्यंत २० जणांना अटक केली आहे. त्यापैकी १८ लोक बाॅलीवूडशी संबंधित आहेत. एनसीबीने क्षितिजच्या आधी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, अब्बास लखानी, करण अरोरा, झैद विल्तरा, अब्दुल बासित परिहार, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत, कैझन अब्राहिम, अनुज केसवानी, अंकुश अनरेजा, करमजितसिंह आनंद, संकेत पटेल, संदीप गुप्ता, आफताब अन्सारी, ड्वेन फर्नांडिस, सूर्यदीप मल्होत्रा, क्रिस कोस्टा आणि राहिल विश्राम यांना अटक केलेली आहे.
रकुलप्रीतसिंहनेही घेतले क्षितिजचे नाव
रकुलप्रीतसिंहनेही चौकशीत क्षितिजचे नाव घेतले होते. क्षितिज प्रसाद दिल्लीत होता आणि एनसीबीचे समन्स मिळाल्यानंतर मुंबईत आला होता. एनसीबीने विमानतळावरूनच क्षितिजला ताब्यात घेतले. पण त्याआधीच क्षितिजच्या मंुबईमधील घरावर छापा टाकण्यात आला होता, त्यात अमली पदार्थ जप्त करण्यात आले.