दोन वर्षांतच रस्त्याची चाळण! सुरवडी–साखरवाडी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिकांचा संताप


सुरवडी–साखरवाडी मार्गाची दुरवस्था. दोन वर्षांपूर्वीचे डांबरीकरण उखडले; खड्ड्यांमुळे अपघात वाढले. तातडीने दुरुस्तीची मागणी.

स्थैर्य, फलटण, दि. २० फेब्रुवारी : फलटण तालुक्यातील सुरवडी–साखरवाडी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून अवघ्या दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या डांबरीकरणाची अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी खोल व रुंद खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

सुरवडी एमआयडीसी तसेच साखरवाडी परिसरातील साखर कारखान्यांकडे रोज हजारो कामगार, कर्मचारी व शेतकरी या मार्गाने ये-जा करतात. सकाळ-संध्याकाळ दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी देखील याच रस्त्याचा वापर करतात. मात्र सध्याच्या अवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, संबंधित बांधकाम विभागाने कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले असून डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. शासनाच्या नियमानुसार काम पूर्ण झाल्यानंतर किमान पाच वर्षे ठेकेदाराने देखभाल व दुरुस्ती करणे बंधनकारक असताना त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत असून विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. “दररोज हजारो वाहनांची ये-जा असताना रस्त्याची अशी दुरवस्था असणे धोकादायक आहे. संबंधित विभागाने तात्काळ दर्जेदार दुरुस्ती करावी,” अशी मागणी साखरवाडी येथील संजय भोसले यांनी केली आहे.

नागरिकांनी तातडीने डांबरीकरण व कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

दरम्यान, संबंधित विभागाने पाहणी करून दोषींवर कारवाई करावी आणि सुरवडी–साखरवाडी मार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी ठाम मागणी परिसरातील ग्रामस्थांतून होत आहे.


Back to top button
Don`t copy text!