
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचा विद्यार्थी सुरज काळेल आणि क्रीडा अधिकारी प्रा. आर. एन. सोडमिसे यांची विशाखापटनम येथे होणाऱ्या अखिल भारतीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संघात अनुक्रमे खेळाडू व प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २८ फेब्रुवारी : श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणच्या शिरपेचात क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. महाविद्यालयाचा होतकरू खेळाडू विद्यार्थी आणि ‘कृषी श्री २०२५’ चा मानकरी कुमार सुरज जनार्दन काळेल याने थेट राष्ट्रीय पातळीवर मोठी झेप घेतली आहे. आंध्रा युनिव्हर्सिटी, विशाखापटनम येथे आगामी काळात होणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘अखिल भारतीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी’ (All India Inter-University Bodybuilding Championship) त्याची महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या संघामध्ये निवड झाली आहे.
याचबरोबर, फलटणसाठी आणखी एक अभिमानाची बाब म्हणजे, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे क्रीडा अधिकारी प्रा. आर. एन. सोडमिसे यांची याच राष्ट्रीय स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV), राहुरी संघाच्या ‘प्रशिक्षक’ (Coach) पदी अधिकृत निवड करण्यात आली आहे.
सदरची राष्ट्रीय पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धा दि. २ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत आंध्रा युनिव्हर्सिटी, विशाखापटनम येथे रंगणार आहे. एकाच महाविद्यालयातून राष्ट्रीय स्तरावर खेळाडू आणि प्रशिक्षक अशा दुहेरी निवडी झाल्याने, फलटणच्या क्रीडा क्षेत्रात आणि महाविद्यालयात सध्या अत्यंत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.
दिग्गजांकडून अभिनंदनाचा वर्षाव:
महाविद्यालयातील विद्यार्थ्याची राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठीय संघात आणि क्रीडा अधिकाऱ्याची राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठीय प्रशिक्षकपदी निवड झाल्याबद्दल फलटणच्या राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आणि फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन केले.
तसेच, प्रशासकीय अधिकारी प्रा. अरविंद निकम सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर आणि कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर यांनी सुरज काळेल आणि प्रा. सोडमिसे यांचे हार्दिक अभिनंदन करून आगामी राष्ट्रीय स्पर्धेतील त्यांच्या यशस्वी वाटचालीस आणि उत्तम कामगिरीस शुभेच्छा दिल्या आहेत.
