स्थैर्य, कराड, दि. 12 : बैलगाडी शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाची बंदी असताना तसेच कोरोनाचा पार्श्वभूमीवर जमाव जमन्यास बंदी असतानाही बैलगाड्या शर्यतींचे आयोजन करणाऱ्यासह त्यामध्ये सहभागी होणाऱ्या 15 जणांवर कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करन्यात आला आहे. येरवळे (ता. कराड) येथे शनिवार दिनांक अकरा रोजी सकाळी साडेदहा वाजता पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, येरवळे रेथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले असल्याची माहिती सातारा पोलीस कंट्रोल रूमवरून कराड शहर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन राबाबत खात्री केली असता येरवळे येथे नदीपात्रामध्ये बैलगाडी शर्यत सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कोरोनाच्रा पार्श्वभूमीवरती जमाव जमण्यास बंदी असतानाही बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने तेथे जमाव जमा झाल्याचे दिसून आले. तसेच तेथे सहा बैलगाड्या थांबल्या होत्या. तर नदीपात्रात शर्यतीसाठी चाकोऱ्या पाडल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळेला दोन बैलजोड्यांची शर्यत सुरू असताना बैलांना चाबकाने मारून पळवत असल्याचेही पोलिसांनी पाहिले. दरम्यान पोलिसांना पाहताच बैलांसह मालक व बैल पळवणारे तेथून पळून गेले. पोलिसांना आखाड्याजवळ एक मुलगा मिळून आला. त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी पंधरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी खाडे, लादे, काटे यांनी ही कारवाई केली.