
स्थैर्य, फलटण, दि. 27 नोव्हेंबर : शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण शहराला शांतता आणि विकासाच्या मार्गावर पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. फलटण शहर सुसंस्कृत, शांततापूर्ण आणि सामाजिक ऐक्य जपणारे आहे. शहराची ही ओळख आपल्याला अखंड कायम ठेवायची आहे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.
श्रीमंत अनिकेतराजे यांनी सध्या शहरात सुरू असलेल्या ‘दहशती’च्या मुद्द्यावर लक्ष वेधले. ते म्हणाले, सत्तेचा गैरवापर करून इथे सुरू झालेली दहशत आपल्याला वेळेत थांबवायची आहे. त्यासाठीच आपण शिवसेनेला स्वीकारले आहे. शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी माझ्यासह शिवसेना, काँग्रेस आणि कृष्णा भिमा विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी गेल्या ३० वर्षांत केलेला विकास, शहराची जपलेली चांगली ओळख आणि तुम्हा नागरिकांचे समाधान पुढे नेण्यासाठी मला साथ द्या. या कामात खंड पडू न देण्याचा त्यांचा मानस आहे.
श्रीमंत अनिकेतराजे यांचा फलटण शहरात रोजचा जनसंपर्क सुरू आहे. मतदारांच्या भेटीगाठी, बैठका आणि ‘हाऊस टू हाऊस’ प्रचाराने चांगला वेग घेतला आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे मतदारांमध्ये त्यांच्या नेतृत्वाविषयी सकारात्मकता दिसत आहे.

