‘दहशतमुक्त फलटणसाठी आम्हाला साथ द्या’! : सचिन सूर्यवंशी बेडके यांचे आवाहन


स्थैर्य, फलटण, दि. 27 नोव्हेंबर : प्रभाग क्रमांक १३ मधील शिवसेना-काँग्रेस-कृष्णा भीमा विकास आघाडीचे उमेदवार सचिन सूर्यवंशी बेडके यांनी प्रचारात नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या आपल्या प्रभागात रस्ते, पाणी आणि सुरक्षा हे प्रश्न ऐरणीवर आहेत. आपल्याला संधी मिळाल्यास पालिकेच्या माध्यमातून सर्वप्रथम हे प्रश्न सोडवण्याचा आपला ठाम मानस आहे, असे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले आहे.

सचिन सूर्यवंशी बेडके मतदारांना सांगतात की, आपला प्रभाग शहरातील सर्वाधिक साक्षर प्रभाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सुशिक्षित नागरिकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा. शहराच्या विकासासाठी, शहर सुरक्षित ठेवण्यासाठी आणि विशेषतः शहर दहशतमुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

या महत्त्वाच्या कामांसाठी मतदारांनी आपल्यासह शिवसेना, काँग्रेस आणि कृष्णा भिमा विकास आघाडीच्या उमेदवारांना साथ द्यावी, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले आहे. शहराची शांतता आणि सुसंस्कृतपणा जपण्यासाठी महाविकास आघाडीचे नेतृत्व आवश्यक आहे, असे ते पटवून देत आहेत.

सध्या सचिन सूर्यवंशी बेडके यांनी मतदारांशी बैठका, चर्चा आणि गाठीभेटींचे सत्र रोज सुरू ठेवले आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा तातडीने पूर्ण करून प्रभागाला विकासात आघाडीवर नेण्याचा त्यांचा निर्धार आहे.


Back to top button
Don`t copy text!