स्थैर्य, कोळकी दि.9 : गावात शुद्ध पाणी, स्वच्छ परिसर, पक्के रस्ते, नागरिकांचे आरोग्य, प्रदूषणमुक्त वातावरण, बेरोजगारांच्या हाताला काम यासाठी आम्ही कटीबद्ध राहणार असून मतदारांनी गावाच्या हितासाठी, समतोल विकासासाठी आणि उद्याच्या भविष्यासाठी आपली बहूमोल साथ आम्हाला द्यावी, असे आवाहन प्रभाग क्रमांक 6 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाचे अधिकृत उमेदवार तुषार नाईक निंबाळकर, सौ.राधीका पखाले व सौ.तेजश्री मुळीक यांनी मतदारांना केले आहे.
कोळकी ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचाराला वेग आला असून उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी – भेटींवर जोर दिल्याचे दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 6 मधील भुजबळ मळा, अजित नगर, अक्षत नगर, शारदा नगर, पखाले वस्ती व श्रीमंत मालोजीनगर या भागात प्रचारादरम्यान तुषार नाईक निंबाळकर, सौ.राधीका पखाले व सौ.तेजश्री मुळीक यांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे.
कोळकी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आजवर गावात राष्ट्रवादीने अनेक विकास कामे केली आहेत. इथून पुढील काळातहीं ग्रामस्थांच्या मुलभूत सुविधांसाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहणार आहोत. आपल्या प्रभागासह संपूर्ण गावात नियमित व शुद्ध पिण्याचे पाणी, ‘स्वच्छ व सुंदर कोळकी’ या ब्रीद वाक्यानुसार गावात स्वच्छता उपक्रम, दळणवळणासाठी पक्के रस्ते, नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी विशेष लक्ष, अबालवृद्धांसाठी बागबगिचे, युवकांसाठी व्यायामशाळा, क्रीडांगण, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आदी उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे. तरी ग्रामस्थांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता, गावाच्या हितासाठी, समतोल विकासासाठी उद्याच्या भविष्यासाठी राष्ट्रवादी प्रणित राजे गटाच्या अधिकृत उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहनही तुषार नाईक निंबाळकर, सौ.राधीका पखाले व सौ.तेजश्री मुळीक यांनी मतदारांना केले आहे.