फलटण तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी साथ द्या; प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २६ : कोरोना वाढता प्रादुर्भाव आणि वाढत्या रुग्ण संख्येला सर्व पुरेशा वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी ठोस भूमिका घेतल्याने आता शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर बेड उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात पुरेसे बेड उपलब्ध नाहीत आणि वैद्यकीय सेवा पुरेशा नसल्याचे कारण देत अनेकांनी गृह विलगीकरणाचा मार्ग स्वीकारला मात्र तेथे सर्व नियम निकषांचे पालन होत नसल्याने कुटुंब, त्यानंतर शेजारी आणि एकाच गावात मोठ्या संख्येने बाधीतांची संख्या वाढत असल्याने पाहणी केल्यानंतर गृह विलगीकरण फायदेशीर नसल्याचे स्पष्ट झाल्याने ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरण संकल्पना राबवून सामाजिक संस्था, व्यक्ती, राजकीय पक्ष वगैरेंनी ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात बेड आणि वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत, त्याचा लाभ घेऊन कोरोना हद्दपारीच्या प्रयत्नात साथ करण्याचे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.

फलटण शहरात शासकीय व खाजगी रुग्णालये, कोरोना हेल्थ केअर सेंटर्सच्या माध्यमातून व्हेंटीलेटर्स, आयसीयू, ऑक्सिजन सुविधा असलेले आणि जनरल असे एकूण ७५७ बेड उपलब्ध आहेत. आजच्या स्थितीला त्यापैकी केवळ ४१९ बेडवर रुग्ण दाखल असून ३३८ विविध प्रकारचे बेड उपलब्ध आहेत. त्यामध्ये व्हेंटीलेटर सुविधेच्या १७ पैकी ४, आयसीयू सुविधेच्या १४३ पैकी ६२, ऑक्सिजन सुविधेच्या १८६ पैकी ७० आणि जनरल ४११ पैकी २०२ बेडचा समावेश आहे, याशिवाय ग्रामीण भागात सुरु करण्यात आलेल्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ही शेकडो बेडस उपलब्ध असल्याचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

एवढ्या मोठ्या संख्येने बेड व वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत याचा अर्थ कोरोना तालुक्यात नाही असे कोणीही समजण्याचे कारण नाही दररोज येणाऱ्या तपासणी अहवालानुसार फलटण तालुक्यात रोज ३५० ते ४०० बाधीत आढळून येत आहेत, त्याशिवाय दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही संख्या वाढण्याचा धोका असल्याने सुविधा वाढविण्यात आल्या आहेत, त्याच बरोबर अनेक बाधीत व्यक्ती अद्याप गृह विलगी करण स्विकारुन धोका वाढवीत आहेत त्यामुळे सुविधा मुबलक असल्याचे दिसते मात्र ते तसे नसल्याचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

दि. २५ ते ३१ मे अखेर संपूर्ण फलटण तालुक्यात कडक लॉक डाऊन जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करुन सहकार्य करण्याचे आवाहन करतानाच कोणीही बाधीत अथवा चाचणी करण्यापूर्वी संशयीत व्यक्तींनी आता घरात न थांबता रुग्णालय, कोरोना केअर सेंटर येथे दाखल होऊन उपचार घ्यावेत असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!