
दैनिक स्थैर्य । दि. ३१ डिसेंबर २०२२ । मुंबई । राज्यात नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. भाजप-शिवसेना तसेच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि ठाकरे गटाला अनेक ग्रामपंचायतींमध्ये निर्विवाद वर्चस्व सिद्ध करण्यात यश आले आहे.एकंदरितच ग्रामपंचायतींच्या निकालावर सर्वच राजकीय पक्षांचा दबदबा दिसून आला आहे.पंरतु,आता यापुढचे राजकारण हे समाजकारणासाठी करण्याचा संकल्प नवनियुक्त सरपंचांनी करावा,असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी केले.
देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या ग्रामीण भागात वास्तव्याला आहेत.अशात ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी ग्रामपंचायतींचे पाठबळ आवश्यक असल्याचे मत हेमंत पाटील यांनी व्यक्त केले. कोरोना काळात ग्रामीण भागाने देशाच्या अर्थव्यवस्थेला तारले.आता ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणखी बळकट करण्याचे कार्य नवनियुक्त संरपंचांना करायचे आहे. ग्राम पातळीवर सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजाणी करण्याचे तसेच नाविन्यपुर्ण प्रयोग,उपक्रम हाती घेवून गावांना विकासाच्या मुख्यप्रवाहासोबत जोडता येईल,असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केली.
सर्व सरपंचांनी त्यामुळे गावाचा विकास करतांना राजकारण सोडून समाजकारणाचा दृष्टीकोन अंगीकारत ‘डेव्हलपमेंट’ करावी. भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी ग्राम स्तरावर समिती स्थापन करावी तसेच लोकांना विश्वासात घेवून सर्वसमावेश विकास करावा,असे आवाहन पाटील यांनी केले आहे.सरपंचांनी महिन्याकाठी गावात करण्यात आलेल्या विकासकार्यांची माहिती दवंडी देवून समस्त गावकऱ्यांना द्यावी, असे आवाहन देखील पाटील यांनी यानिमित्ताने केले आहे.