स्थैर्य, वडूज, दि.२२: गटप्रवर्तक व आशा सेविकांचे मानधनासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सुरु असलेल्या संपाला खटाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आजी – माजी पदाधिकारी व पत्रकारांनी पाठिंबा दिला असून मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. सदरचे निवेदन खटाव तहसिलदारांना देण्यात आले असून निवेदनावर वडूज नगरपंचायतीचे विरोधी पक्ष नेते शहाजीराव गोडसे, विजयकुमार शिंदे, लालासोा माने, वृषाली रोमण आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
कोरोना काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून गटप्रवर्तक व आशा सेविका आपल्या जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांना रोज 2-3 किलोमीटरची पायपीट करुन समाजात कोरोना विरोधात जनजागृती व माहिती संकलनाचे काम करावे लागत आहे. हे करत असताना शिवीगाळ, दमदाटी अशा प्रकारांनाही त्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी ते अतोनात कष्ट घेत आहेत. मात्र त्यांना मानधनासाठी संप करावा लागत आहे हे दुर्दैवी आहे. शासन, प्रशासन व समाज यांमधील एक म्हत्त्वाचा दुवा म्हणून काम करणार्या गटप्रवर्तक, आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासनाने त्वरित तोडगा काढावा अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल, असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.