स्थैर्य, सातारा, दि. २७ (अजित जगताप) : पूर्वीच्या काळामध्ये जावळी तालुक्यात माणूस आजारी पडला की त्याला वाई, पाचगणी, सातारा शहरात घेऊन जावे लागत होते. वाहतुकीची व्यवस्था नसल्यामूळे बैलगाडीतूनच रुग्णाला घेऊन जावे लागत होते. ही मनाशी शैल्य जावळीचे पहिले पंचायत समिती सभापती स्व. संपतराव परामणे यांना वाटत होते. त्यांनी जावळी तालुक्यात एका तरी गावात सरकारी रुग्णालय उभारले पाहिजे यासाठी जागेची शोधाशोध केली. कुडाळ, हुमगाव, आखाडे या ठिकाणी काही जमीनदारांना रुग्णालयासाठी जमीन देण्याची विनंती केली. त्याला अपयश आल्यानंतर स्व. संपतराव वामनराव परामणे यांनी सोमर्डी येथील स्वमालकीची गट नंबर २०९ मधील तीन एकर जमीन मोफत देण्याचा निर्णय घेतला. या साठी त्यांचे बंधू तानाजी व गेनू परामणे यांनी मोठ्या मनाने जमीन देण्यासाठी मान्यता दिली. त्यानंतर सभापती परामणे यांच्या वीस खणी कौलारू घरात रुग्णालय सुरू केले. याच भागातील धरमु तरडे – पाटील, भानुदास तरडे – इनामदार (बामणोली), साहेबराव शिर्के (म्हसवे), बालकू पाटील (काटवली), सर्जेराव निकम (करंदी), हणमंतराव शिंदे (हुमगाव), राम पाटील (वालुथ) अश्या अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले. तर काहींनी रुग्णालयाच्या इमारतीसाठी श्रमदान केलेले होते. आज ५५ वर्षानंतर जावळी तालुक्यातील शिंदेवाडी ते सरताळे या तीस हजार लोकसंख्या असलेल्या भागात सध्या सोमर्डी ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर आधारभूत ठरले आहे. परमाळे यांनी त्या काळी घेतल्याला निर्णयाचा फायदा आज जावळी तालुक्यातील नागरिकांना होत आहे. आज ४० कोरोनाबाधित रुग्ण त्याठिकाणी उपचार घेत आहेत.
सध्या देशभरात कोरोनाची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सर्वाधिक टीका लोकप्रतिनिधींवर होत असली तरी सातारा जिल्ह्यात जावळी तालुक्यातील सोमर्डी येथे ५५ वर्षांपूर्वी रुग्णालयात उभे केले होते. आजही कोरोनाच्या काळात त्याचा रुग्णांना लाभ होत आहे. याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णालय किंवा खाजगी दवाखान्याची सोय नव्हती.या बाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते अशोक परामणे यांनी दिली.
त्या काळी दूरदृष्टीचे नेते स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. किसनवीर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष स्व. आबासाहेब पार्लेकर, उपाध्यक्ष स्व. शंकरराव जगताप, अध्यात्मिक वारसा जपणारे नेते स्व. भि. दा. भिलारे गुरुजी, लालसिंगराव शिंदे, स्व. जी. जी. कदम यांनी सरकारी दरबारी अनुदानासाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे सोमर्डी रुग्णालयाची उभारणी यशस्वीपणे पार पडली. स्व. संपतराव परामणे यांच्या कुटुंबातील सदस्य यांनी सोमर्डी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या जेवणाची त्याकाळी मोफत सेवा केलेली होती. आज स्व. परामणे यांचा स्मूतीदिन व कोविड महामारीचे संकट समयी त्यांच्या कार्याने जावळीकरांना दिलासा मिळाला आहे. हे जावळीकरांचे भाग्य असून सर्व पक्षीयांच्या वतीने जावळीचे जेष्ठ नेते माजी सभापती पै. साहेबराव आबाजी पवार व उपसभापती रविंद रामराव परामणे तसेच दलित सेना प्रदेश सरचिटणीस प्रेमानंद जगताप – सायगावकर यांच्यासह इतर मान्यवरांनी स्व. परामणे यांना श्रद्धांजली अर्पण केली.