श्रीमंत रामराजे व अन्य मान्यवर गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून हंगामाचा शुभारंभ करताना. |
स्थैर्य, फलटण दि. ११: आर्थिक गर्तेत रुतलेल्या श्रीरामला पूर्व वैभवाप्रत नेण्यात सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाल्यानंतर आता साखरवाडी कारखाना पूर्व वैभवाप्रत नेण्यासाठी श्री दत्त इंडिया कंपनीला साथ करुन साखरवाडी व परिसरावर आलेले सावट दूर करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
श्री दत्त इंडिया प्रा. लि., यांच्या साखरवाडी साखर कारखान्याचे बॉयलर अग्नी प्रदीपन व मोळी पूजनाने कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आला, अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महंत श्यामसुंदर शास्त्री विद्वांस होते. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, उपसभापती सौ. रेखाताई खरात, कंपनी संचालक प्रीती रुपारेल, संचालक जितेंद्र धारु, परीक्षीत रुपारेल आदी मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
गतवर्षी पहिल्याच हंगामात २ लाख ६० हजार मे. टन ऊसाचे गाळप करण्यात आले, यावर्षी मात्र कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून ५ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्याच्या पूर्ततेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत आहे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस गाळपासाठी या कारखान्याला देऊन सहकार्य करावे असे आवाहन यावेळी संचालक जितेंद्र धारु यांनी केले आहे.
गतवर्षीच्या हंगामात गाळपास आलेल्या संपूर्ण ऊसाचे पेमेंट प्रति टन २५०० रुपयांप्रमाणे करण्यात आले असून यावर्षीही एफ आर पी प्रमाणे संपूर्ण पेमेंट करण्याची ग्वाही देत यावर्षी कारखान्याकडे सुमारे ८ हजार हेक्टर क्षेत्रातील ऊसाची नोंदणी झाली असून कारखाना व्यवस्थापनाने लागण तारखानुसार तोडणी वाहतूक कार्यक्रम तयार केल्याचे निदर्शनास आणून देत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन कारखाना उत्तम प्रकारे चालविण्याची ग्वाही यावेळी जितेंद्र धारु यांनी दिली.