दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२१ । फलटण । फलटण शहरामध्ये स्वच्छ व निर्जंतुकीकरण पाणी वाटप होण्यासाठी काल नगरपालिकेच्या वतीने व्ही वायर सिस्टीमचे भूमिपूजन संपन्न झाले, हे उत्कृष्टच आहे. परंतु फलटण शहराच्या सर्व भागामध्ये तास ते दोन तासापेक्षा जास्त वेळ पाणीपुरवठा कोठेही होत नाही. तरी फलटण नगरपरिषदेने संपूर्ण फलटण शहरामध्ये चोवीस तास पाणीपुरवठा करावा, असा टोला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांनी लगावला आहे.
फलटण शहरामध्ये स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेले पाणी वितरित होण्यासाठी व्ही वायर या सिस्टीमचे भूमिपूजन काल संपन्न झाले. तरी फलटण शहरामध्ये चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठी फलटण नगरपरिषदेने पाणी पुरवठा करण्याच्या प्रक्लपामध्ये जनरेटर बसवणे गरजेचे आहे. तरी आगामी काळामध्ये फलटण नगरपरिषदेने फलटण शहरामध्ये चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांनी केलेली आहे.