“मी ‘जयभीम’ची सून, या मातीतच मरणार”; सुपर्णा अहिवळेंचे विरोधकांना सडेतोड उत्तर


‘मी जातीपातीचे राजकारण करत नाही, मी जयभीमची सून आहे,’ असे ठणकावून सांगत सुपर्णा अहिवळे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. प्रभाग २ मधील प्रचारसभेत जिजामाला नाईक निंबाळकर यांनीही केले मार्गदर्शन.

स्थैर्य, फलटण, दि. १३ डिसेंबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. प्रभाग क्रमांक २ मधील महायुतीच्या (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) उमेदवार सौ. सुपर्णा सनी अहिवळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या भावूक झाल्या. “माझ्यावर जातीवाचक टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, मी ‘जयभीम’ची सून आहे आणि याच मातीत मरणार,” असा सणसणीत टोला त्यांनी विरोधकांना लगावला. यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही मतदारांना मार्गदर्शन केले.

जातीवाचक टीकेला चोख प्रत्युत्तर

प्रभाग क्रमांक २ च्या उमेदवार सुपर्णा अहिवळे यांनी आपल्यावर होणाऱ्या अपप्रचाराचा आणि जातीवाचक टीकेचा खरपूस समाचार घेतला. त्या म्हणाल्या, “माझ्याबद्दल सध्या काही चर्चा सुरू आहेत की मी मराठा समाजाची आहे, म्हणून मला मतदान करू नका. पण मी आज छातीठोकपणे सांगते की, मी ‘जयभीम’ची सून आहे आणि याच मातीत मरणार आहे.”

“मी आजवर कधीही जातपात मानली नाही. मंगळवार पेठेत मी मनापासून काम केले आहे. मी इतर उमेदवारांसारखी बाहेर राहत नाही, तर रात्री-अपरात्री माझ्या महिला भगिनींच्या मदतीसाठी धावून जाते. मी तुमचीच मुलगी आणि सून आहे, त्यामुळे २० तारखेला योग्य निर्णय घ्या,” असे भावनिक आवाहन त्यांनी मतदारांना केले.

मुलींनो, मोबाईलपेक्षा अभ्यासाला महत्त्व द्या

यावेळी जिजामाला नाईक निंबाळकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला. कु. अमृता अहिवळे हिचा सत्कार करताना त्या म्हणाल्या, “मुलींच्या यशामागे वडिलांचे प्रोत्साहन आणि आईचा त्याग महत्त्वाचा असतो. लक्ष्मी आणि सरस्वतीची कृपा हवी असेल तर शिक्षणाला पर्याय नाही. आजच्या काळात मुलींनी मोबाईलचा अतिवापर टाळून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि उच्च शिक्षण घेऊन फलटणचे नाव उज्ज्वल करावे.”

यावेळी त्यांनी सुपर्णा अहिवळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन मतदारांना केले. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!