संडे इज अ मटण डे ते नॉलेज डे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


अलीकडच्या काळात ‘संडे इज अ मटन डे’ असे अनेक संघटनाच्या कार्यकर्त्याकडून ऐकलेले वाक्य मला आठवते. ‘रविवार माझ्या आवडीचा’ म्हणून लहान मुलाने आकाशवाणीवर सादर केलेले बालगीत देखील मी ऐकले आहे. सोमवार ते शनिवार रोज शाळेत जाणारी बच्चे मंडळी रविवारी मैदानावर आनंदाने सूर फाट्या,कबड्डी,आणि अलीकडे क्रिकेट खेळताना देखील पाहिलीत. रविवारी सकाळी उशिरा उठणारे नोकरदार देखील पाहिलेत.अनेक नोकरदार महिलांना, रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही तोच खरा कामाचा दिवस आहे म्हणून घर नीट नेटके करताना आणि स्वच्छता,धुणी,भांडी,जेवण,मुलांचे संगोपन इत्यादी कामात तरीही घरी असल्याचा आनंद घेताना पाहिले आहे.रविवारी सकाळीच मटणाच्या दुकानात जाऊन रांगेत उभे राहून पहिले मटण आणून घरी देऊन नंतर आपले मुखमार्जन करणारे देखील पाहिले. तर कष्टकरी अनेक महिला, मटनवाला शिरप्या अजून कसा आला नाही म्हणून काम करत करतशेजारणीकडे विचारणाऱ्या देखीलबघितल्यात.कलेजा,गुडदा,पाय,खुर,मुंडीचरबी,सीना, चाप ,मान,फासी,गुड्सा,मेंदू,वजडी,नळी,रक्ती, ..कापलेल्या बोकडाचे पसंतीनुसार अवयव घेऊन मटन खाऊन ताणून देत दिवस थकलेल्या शरीराला व मनाला विसावा म्हणूनच रविवार हा उपयोगात आणणे हे आमचे जीवन झाले आहे. हे सगळे चवीने वर्णन केल्यानंतर अजून काही माझ्या मनात येतेय ते सांगण्यासाठी हे माझे व्यक्त होणे आहे. हरिवंशराय बच्चन यांच्या एका कवितेत आजच्या माणसांची स्थिती काय झाली आहे हे वाचनात आले होते.कवितेतल्या ओळी होत्या ’’मद्यं सरणम गच्छामि | मासं शरणं गच्छामि | डान्स गच्छामि’ यावर विचार करताना लक्षात आले की दारूच्या अधीन झालेले लोक मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. महाराष्ट्र ‘अनिसने दारू नको,दूध प्या’ हा विचार सांगून शक्तिवर्धक घेण्याचे आवाहन केले होते. अनेक तरुण मुले दारू घरात विकत आहेत.आणि ‘दारू विकायला आम्हाला जागा द्या म्हणणारे’ उर्मट लोक देखील असतात इथपर्यंत खालच्या स्तरावर आलेले लोक पाहिलेत. कष्ट न करता दुसऱ्याचे मिळतील त्या मार्गाने पैसे कमावणे व दारू पिऊन आम्ही महान आहोत हे म्हणणे आपल्या शेजारपर्यंत आले आहे. सोपे,स्वस्त मार्ग घेऊन स्वतःला,कुटुंबियांना आणि समाजाला बरबाद करणाराना राजकारणी नेते, प्रतिष्ठीत करतात आणि विचारी लोकांचा उपहास करतात हे ही पाहिले आहे. मताच्या बेरजेसाठी फक्त माणसे हवीत.ती गुलाम म्हणून आपल्याकडे राहिली तर चांगलेच आहे. चार हाडके कुत्र्याला टाकली की तो चांगला वाईट माणूस बघत नाही तर त्याला फक्त हवे असते हाडूक. ते चघळायला मिळाले की लोकशाही काय आणि हुकुमशाही काय? अशी बकरी समाजात तयार झालीत. ती नुसती बे.बे करत राहतात. जाणून घेण्याची इच्छा मरते इतके अगतिक होतात काहीजण.दारू मटणाच्या गर्दीत ज्ञानी बनायचे. विचारी बनायचे राहून गेले आहे.आणि एक चांगला समाज घडवायचे देखील राहून गेले आहे.संवेदना ठेवून आपल्या परिसरातील मुलांना योग्य पर्यावरण निर्माण करून द्यायचे राहून गेले आहे. अनेक वाहिन्या,समाज माध्यमे यात स्वातंत्र्याचं अतिरेक झाल्याने कायदा मोडणारे आहेत त्यांचे कौतुक केले जात आहे.असे हिरो समाजात भाई बनू इच्छित आहेत आणि त्यांची मित्रमंडळे ही देखील मटण शिजवितात तसे सोयीचे राजकारण शिजवित असतात.सामाजिक जाणीवेपासून कोसो दूर जाणारे मग कोणातरी धर्मांध गुरुचे हस्तक बनतात हिंसा वाढवत राहतात. म्हणूनच नव्या पिढीला चांगल्या सत्कर्माचे पर्यावरण करून देण्याची गरज मला वाटते. अनेकदा जयंती कार्यक्रमात व्याख्याने देताना असे आढळले आहे की असे कार्यक्रम,वर्षातून दोन तीन दिवस एकत्र येऊन केले जातात. पण पुन्हा वर्षभरात काहीच नाही,ही पद्धत बिलकुल उपयोगी नाही.

मला आठवते की मी १० वी नापास झालो. त्यात माझी दोन वर्षे गेली. या बेकार जिंदगीने मला जाणीव शिकवली.त्या काळात ४ थी ५ वी शिकणारी मुले गावातल्या एखाद्या शेतकऱ्याच्या गुरावर आणि म्ह्सरावर ठेवली जायची. त्यांच्या नावावर गरीब आईबाप उचल घ्यायचे.आणि ही मुले पुन्हा शिक्षणापासून वंचित व्हायची.एकाच घरात पिढ्यानपिढ्या मजुरी,किंवा सालावर गडी ठेवण्याचे प्रकार पाहिल्यावर मी कॉलेजला गेल्यावर मला या मागचे गणित कळायला लागले.ही मुले बाहेरगावी शाळेत जायला हवीत,पालकांनी मुलांना शिकवायला पाहिजे हे मी खूप तळमळीने घराघरात जाऊन सांगितले.त्यातून शिक्षण देण्याची भावना वाढवली.मी सातारला शिकत होतो त्या वेळी दिवाळी आणि उन्हाळी सुटीत गावी असायचो, मी गावातील आमच्या झोपडपट्टीत सुटीच्या काळात मुलांच्या प्रगतीसाठी ‘साहित्यवेल प्रबोधन प्रशाला’ सुरु केली. कर्मवीरांनी जशी अनेक जातीजमातीची मुले गोळा करून मुलांना शिक्षण देण्यासाठी कळकळीने काम केले.तसे माझ्यासारखे मुलांनी नापास होऊ नये म्हणून इंग्रजी आणि गणित या दोन या विषयाचे तास आमच्या घरी,भीमराव मोरे यांच्या घरी मोफत सुरु केले होते. यात उद्देश असा होता की ज्याला जे चांगले येते ते कॉलेज शिकलेल्या मुलांनी लहान मुलांना शिकवायचे.यातून शिक्षणाचे वातावरण उभे राहिले. अनेक निरक्षर पालकांनी जाणीवेने मुले सुटीत आमच्या सोबत राहू दिली.त्याचे रिझल्ट कमी जास्त प्रमाणात आले.पण शिकण्याची व शिकविण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली हे मला आठवते.दिवाळी सुटीत फटाके वाजवून दिवाळी साजरी करू नये.पुस्तके वाचून ज्ञान दीपावली कार्यक्रम आम्ही सुरु केले.झोपडपट्टीतील अनेक तरुण यांनी जबाबदारीने हे काम सुरु केले.लहान मुलांच्यात मिसळायला मला आवडत होते.कार्यक्रम घेणे आवडत होते.आमचे घर म्हणजे सांस्कृतिक,वैचारिक केंद्र करण्याचा माझा प्रयत्न होता. मला देखील मुले अण्णा म्हणत,गाणी म्हणायची,पाढे पाठ करायची,शाळेतल्या कविता गायची,गोष्टी सांगायची,नृत्य सादर करायची,भाषणे द्यायची,माझ्या भाषणाने प्रभावित व्हायची,व्यायाम देखील करायची,लहानपणापासून निर्व्यसनी रहायचे असे संस्कार आम्ही देत होतो. गावात जुगार चालायचा त्याचे संस्कार त्यावेळी व्हायचे. जुगार हा मन चळवणारा विकार आहे हे हळू हळू लक्षात आले.साहित्यवेलमध्ये शिकविणारे कुणाचा एक रुपया घेत नव्हते. जाणीव मनात होती.गोळ्या बिस्किटे अधून मधून वाटली जायची.ज्ञानरचनावाद हा शब्द आता आला,त्यावेळी आमच्या मनात येणाऱ्या चांगल्या कल्पना मुलांना सांगून मुले घडविण्याचे काम आम्ही करीत होतो. मी कॉलेजमध्ये प्राध्यापक झाल्यावर गावी येणे जाणे कमी झाले तरी मी साहित्यवेलने इतका प्रभावी होतो की माढा इथे शासकीय वसतिगृह येथील २०-३० मुले,जनार्धन चव्हाण वसतिगृह मधील ५-१० मुले यांना पटवून देऊन आपण आपल्या गरीब असलेल्या मुलांच्यासाठी एक तास रोज झोपडपट्टीत शिक्षण देऊया असे आवाहन मी केले.त्यातून ८-९ महिने मुलांनी रोज रात्री ७ ते ८ चे दरम्यान माढा येथील झोपडपट्टीत मुलांचे इंग्रजी व गणित यांचे तास घेतले.झोपडपट्टीतील हित ओळखणाऱ्या लोकांनी आपल्या मुलांना खूप शिकविले.नव्या चांगल्याला विरोध होत असतो. वाघमारे सरांची संस्था असून त्यांना शासनाकडून पैसे मिळत असतील ,त्या शिवाय उगाच करतात का ? अशी हूल उठवण्यात आली. त्यावेळी कोणतीही

जयंत्या दोनचार दिवस करून नुसते फोटो पूजन आणि मिरवणुका काढून काही होत नसते. ज्ञान आणि शहाणपण जाणीवेने,कृतीने द्यावे लागते.सत्य समजून चांगले काय हे सांगावे लागते.म्हणूनच विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमित ज्ञान शाळा देतील पण दर रविवारी शहाणपण देण्यासाठी किमान एक तास आपण लहान मुले,कॉलेजचे तरुण ,या उदयोन्मुख पिढी एकत्र यायला हवी.आणि आपले सध्याचे प्रश्न काय आहेत .आणि ते कसे सोडवायचे याचे ज्ञान बैठक भरवून द्यायला हवे. मला ही गरज जास्त जाणवत आहे.सभोवताली घडणाऱ्या अविवेकी घटना कोणत्या आहेत?त्या का कुणी घडवल्या ? त्यांचे दृष्टीकोन काय आहेत?. आपण डोळसपणे प्रश्न विचारावेत उत्तरे शोधावीत यासाठी रविवारी संध्याकाळी ६ ते ७ वेळात आवर्जून बैठक घेतली पाहिजे .मी यालाच नॉलेज डे म्हणतो. दररोज समता अभ्यासकेंद्र दर गावात सुरु व्हावे.गावातील युवक शालेय विद्यार्थी यांनी अनुभव व्यक्त करावेत. जयपूर या गावी मला बौद्ध विहार,समाज मंदिरात विविध पुरोगामी पुस्तके मुलांसाठी वाचनास उपलब्ध करून दिल्याचे दिसले. प्रत्येक गावात ‘संडे इज अ नॉलेज डे’ ही संकल्पना रुजली पाहिजे. संविधान कर्तव्ये,हक्क जबाबदारया याची जाणीव मुलांना करून दिले पाहिजे साधना,समाज प्रबोधन,परिवर्तनाचा वाटसरू,सुगावा,मिळून सरया जणी,अनिस वार्ता ओतर ,अनिस वार्तापत्र,असे कितीतरी वाचनीय नियमित येणारे पुरोगामी विचार सर्वांच्या पर्यंत पोचणे आवश्यक आहे.पिढ्या घडवायच्या की सडवायच्या हे आपल्या हातात आहे.मध्ये कॉलेजमधील काही मुलांना मी म्हणालो की तुम्ही अर्धा किलो मटण कमी करा,पण एक पेपर आपल्या घरी आला पाहिजे असे पालक व सुजाण विद्यार्थ्यांनी ठरवले पाहिजे ..इवले इवले रोप उगवले साहित्यवेल भरवू दे ! या विश्वामध्ये माणुसकीचा आमचा झेंडा लह्ररु दे ही प्रार्थना मी मळवली येथे साहित्यवेल प्रबोधन प्रशालेसाठी गीत म्हणून लिहिली होती.’’ नको फटाके नको टिकली ,शिक्षणाची संधी हुकली ‘’अशा प्रकारच्या घोषणा मुले देत राहिली.आधुनिक वर्तमान समजून घेऊन आपण ‘संडे इज अ नॉलेज डे’सुरु करायला पाहिजे. प्रगल्भ समाज निर्मितीसाठी चांगले प्रयोग करत चांगले पर्यावरण तयार करायला पाहिजे.धर्मांध लोक आपल्यातल्या मुलांच्या मनात अभिनिवेश निर्माण करून मुस्लीम विरोधी वातावरण या देशात निर्माण करत आहेत.अशा वेळी कुठल्यातरी मूर्ख धर्माध यांचे हस्तक ही मुले व्हायला नकोत.हिंसक पेक्षा अहिंसक ,विचारी कष्टाळू ,कल्पक ,सामाजिक जाणीव ठेवणारी मुले तयार करावी लागतील. भेदभाव निर्माण करणाऱ्या उंडगया नेत्यांची गर्दी कमी करत जाणे ,आणि आशावादी विवेकी मुले घडवीत जाणे आवश्यक आहे . म्हणूनच ‘संडे इज अ नॉलेज डे’करावयाची जबाबदारी आपण घेतली पाहिजे असे मला वाटते.

– प्रा. डॉ. सुभाष वाघमारे,
छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा
९८९०७२६४४०


Back to top button
Don`t copy text!