दैनिक स्थैर्य | दि. ५ एप्रिल २०२३ | फलटण |
सध्या पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या सर्व शालेय परीक्षा संपत आल्या आहेत. परीक्षा संपल्यानंतर मुलांची उन्हाळी सुट्टी सुरू होते. उन्हाळी सुट्टीत आपल्या मुलांवर चांगले संस्कार, चांगल्या सवयी, शिस्त लावण्याची पालकांकडे मोठी जबाबदारी असते, मात्र, ही जबाबदारी पालकांनी सुवर्णसंधी म्हणून घेतली तर मुलांवर चांगले संस्कार करण्यात पालकांना आनंदच वाटेल, हे निश्चित! अशा सर्व जबाबदार पालकांसाठी उन्हाळी सुट्टीतील गृहपाठ तयार केला आहे, तो पुढीलप्रमाणे…
पालकांसाठी सुट्टीतील गृहपाठ
१) रोज सकाळ – संध्याकाळचे जेवण आपल्या मुलांसोबत करा. अन्न वाया जाऊ देऊ नका. त्यांचे ताट त्यांना धुवू द्या.
२) भाजी निवडणे, झाडणे-लोटणे, कपडे धुणे इ. कामे त्यांना करण्यास प्रोत्साहन द्या.
३) शेजारी राहणार्या कुटुंबाकडे जाऊन त्यांच्याशी जवळीक वाढविण्याची संधी द्या!.दुसर्यांच्या मुलांना आपल्या घरी बोलवा.
४) आजी-आजोबांसोबत गप्पा मारण्याची संधी द्या. त्यांच्यासोबत मुलांचे फोटो काढा.
५) आपल्या कामाच्या ठिकाणी मुलांना घेऊन जा. आपण किती कष्ट करतो? कोणते काम करतो? हे मुलांना कळू द्या. त्याची माहिती मुलांना द्या.
६) स्थानिक यात्रा, बाजार अशा ठिकाणी मुलांना सोबत न्या.
७) आपल्या लहानपणीच्या आठवणी, आपल्या पूर्वजांची माहिती मुलांना सांगा.
८) मुलांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. त्यांना बोलते करा.
९) मुलांना इयत्तेनुसार १ ते ३ तास अभ्यासासाठी घरातील नेमून दिलेल्या ठिकाणी बसवा.
१०) मुलांना खेळू द्या, पडू द्या, कपडे खराब होऊ द्या.
११) मुलांना किमान एकतरी पुस्तक विकत घेऊन द्या.
१२) स्वत: मोबाईलचा मर्यादित वापर करा.
१३) मुलाचा चेहरा दोन्ही हातात धरून त्याच्या डोळ्यांत डोळे घालून बघा. ईश्वराने किती अनमोल भेट आपणास दिली आहे, याचा आनंद घ्या.
१४) ‘मुलाचे सर्व हट्ट पुरविणे’ म्हणजे चांगले पालकत्व, ही खुळचट कल्पना डोक्यातून काढून टाका.
१५) आम्ही शिक्षक आणि तुम्ही पालक मिळून उद्याचे सुजाण नागरिक घडवू या.