
दैनिक स्थैर्य । 10 एप्रिल 2025 । फलटण । फलटण शहरात व तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. या काळात दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे असे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे. ज्यांची दुपारच्या वेळी कामाची जबाबदारी असते, त्यांनी पांढऱ्या रंगाचे कापड अथवा टोपी किंवा छत्री वापरून संरक्षण घ्यावे, असे त्यांनी सांगितले आहे. यासोबतच, या दोन ते तीन महिन्यात उन्हाळ्यामुळे पाण्याची पातळी कमी होऊ नये म्हणून नियमित पाणी पिणे आवश्यक आहे, असे सुद्धा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे दुपारी बाहेर पडण्याची गरज असेल तर काही अत्यावश्यक तयारी करणे व काळजी घेणे महत्वाचे आहे. पांढऱ्या रंगाचे कापड अथवा टोपी वापरणे तसेच छत्रीचा वापर करून सूर्यप्रकाशापासून डोक्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे. यामुळे डोके तापणे व सूर्यापासून होणारे उष्माघातासारखे त्रास कमी होतात.
उन्हाळ्यामध्ये शरीरातून पाण्याचे बाष्पीकरण वाढल्याने पाण्याची पातळी खुपच कमी होते. म्हणूनच नियमित अंतराने अधिक पाणी पिण्याची सवय लावावी. पाण्याची पातळी राखण्यासाठी नारळाचे पाणी, कोकमाचा रस, कैरीचे पन्हे, ग्लूकोजसारखे जलद ऊर्जा देणारे नैसर्गिक पेय सेवन करावे आणि शरीरास हानिकारक असणारी कृत्रिम शीतपेये टाळावीत.