
दैनिक स्थैर्य । 16 एप्रिल 2025। फलटण । गुणवरे येथील ईश्वरकृपा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे उन्हाळी शिबिर उत्साहात पार पडले.
ब्लूम स्कूल नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असते त्यासाठी शाळेमध्ये वर्षभर विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास हा देखील खूप महत्त्वाचा असतो. यासाठी ब्लूम स्कूलमध्ये दरवर्षी उन्हाळी शिबिराचे आयोजन केले जाते.
दरवर्षी यावर्षीही मंगळवार दि. 1 एप्रिल ते मंगळवार 15 एप्रिल या कालावधीत सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेमध्ये उन्हाळी शिबिर उत्साहात झाले. या शिबीरात वार्म अप, योगासने, सूर्यनमस्कार तसेच खो-खो, हॉलीबॉल, मल्लखांब, संकटकालीन आपत्ती व्यवस्थापन, छ.उ.उ. ट्रेनिंग, झांजपथक, लाठीकाठी, गोळा फेक, थाळीफेक, रस्सीखेच, क्रिकेट, लेझीम यासारखे वेगवेगळे खेळ घेण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी रांगोळी, मेहंदी, नृत्यकला, बुद्धिबळ, कॅरम इत्यादींचे आयोजन करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर तात्या गावडे यांच्याहस्ते शिबीरात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. संस्थेच्या सचिव सौ. साधनाताई गावडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संभाजी गावडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच पंचक्रोशीतील पालक वर्गांनी हा उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल शाळेचे आभार मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य गिरिधर गावडे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.