
स्थैर्य, फलटण, दि. 23 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून (१-ब) शिवसेनेच्या वतीने, अर्थात राजे गटाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. सुमन रमेश पवार यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे हेच आपले मुख्य ध्येय असून, त्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले आहे.
विकासाची परंपरा कायम राखणार उमेदवारीबाबत बोलताना सुमन पवार म्हणाल्या, “राजे गटाचे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रभागात यापूर्वीही अनेक विकासकामे झाली आहेत. हीच विकासाची परंपरा अखंड ठेवण्यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरले आहे.”
मतदारांना आवाहन येणाऱ्या काळात प्रभागातील रस्ते, पाणी, स्वच्छता आणि नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी आपण तत्पर राहणार आहोत. या विकासाच्या प्रवासात साथ देण्यासाठी मतदारांनी शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर मतदान करून आपल्याला आणि अनिकेतराजे यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन सुमन पवार यांनी केले आहे.
प्रभाग क्रमांक १ मध्ये सुमन पवार यांच्या उमेदवारीमुळे राजे गटाची बाजू भक्कम मानली जात असून, त्यांनी आता प्रचाराला सुरुवात केली आहे.

