फलटणमध्ये ‘सुखकर्ता NGO’च्या तत्परतेमुळे वाचले वासराचे प्राण! चारचाकीच्या धडकेत गमावला पाय; मुक्या प्राण्यांना वाचवण्यासाठी वाहनचालकांना कळकळीचे आवाहन


फलटण येथील रायगड हॉटेलजवळ चारचाकीच्या धडकेत एका वासराचा पाय तुटल्याची हृदयद्रावक घटना घडली. मात्र, धडक देणाऱ्या चालकानेच माहिती दिल्याने ‘सुखकर्ता NGO’ने तातडीने उपचार करून वासराचे प्राण वाचवले.

स्थैर्य, फलटण, दि. 26 फेब्रुवारी : फलटण शहरातील रायगड हॉटेलजवळ एका चारचाकी वाहनाच्या धडकेत एका फिरस्त्या वासराला आपला एक पाय गमावावा लागल्याची अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना रविवारी (दि. २२ फेब्रुवारी) घडली. मात्र, या घटनेत धडक देणाऱ्या वाहनचालकानेच पळून न जाता तत्परता दाखवत ‘सुखकर्ता NGO, फलटण’ या संस्थेला माहिती दिली. त्यामुळे या मुक्या जिवावर तातडीने वैद्यकीय उपचार होऊ शकले आणि त्याचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

असा घडला दुर्दैवी अपघात

रविवारी रायगड हॉटेलजवळून जात असताना एका चारचाकी वाहनाने या फिरस्त्या वासराला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, वासराचा पुढचा पाय गंभीररीत्या दुखावला गेला आणि अर्ध्या पायाचे हाड पूर्णपणे तुटून मांसामधून बाहेर आले. अपघात घडल्यानंतर चालकाने माणुसकीचे दर्शन घडवत थेट ‘सुखकर्ता NGO’ शी संपर्क साधला आणि घटनेची कल्पना दिली. माहिती मिळताच संस्थेच्या कार्यकर्त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली.

शस्त्रक्रिया करून कापावा लागला पाय; उर्वरित आयुष्य ३ पायांवर

घटनास्थळी पोहोचल्यानंतर सुखकर्ता NGO च्या डॉक्टरांनी वासराला तातडीने प्राथमिक वैद्यकीय उपचार दिले. मात्र, पायाचे हाड पूर्णपणे तुटून बाहेर आल्याने त्याला प्लास्टर करणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नव्हते. याबाबत संस्थेच्या डॉक्टरांनी शिरवळ येथील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून सल्ला घेतला. अखेर वासराचा जीव वाचवण्यासाठी आणि संसर्ग (Infection) टाळण्यासाठी त्याच्या त्या पायावर शस्त्रक्रिया करून तो भाग कापून टाकावा लागला आहे.

दुर्दैवाने, या निष्पाप जिवाला आता आपले उर्वरित आयुष्य तीन पायांवरच काढावे लागणार आहे. पुढील दहा दिवस या वासरावर संस्थेच्या देखरेखीखाली नियमित उपचार सुरू राहणार असून, ते लवकरात लवकर बरे व्हावे, अशी आशा ‘सुखकर्ता NGO’ ने व्यक्त केली आहे.

वाहनचालकांना ‘सावकाश गाडी चालवण्याचे’ आवाहन

या घटनेच्या निमित्ताने ‘सुखकर्ता NGO’ ने सर्व वाहनचालकांना एक कळकळीचे आवाहन केले आहे. “वाहनचालकांनी गाडी नेहमी काळजीपूर्वक आणि वेगमर्यादेचे पालन करत सावकाश चालवावी. रस्त्यावरील अशा निष्पाप आणि मुक्या जिवांचा यात कोणताही दोष नसतो, त्यामुळे आपले थोडेसे दुर्लक्ष त्यांच्या जिवावर बेतू शकते. सर्वांनी सार्वजनिक जबाबदारीचे भान राखणे अत्यंत आवश्यक आहे,” असे संस्थेने म्हटले आहे.

या कठीण प्रसंगी वासराचे प्राण वाचवण्यासाठी तातडीने मोलाची मदत करणारे डॉ. शुभम राजेशिर्के आणि ‘फलटण गोसेवा विभाग’ यांचे संस्थेच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले आहेत.


Back to top button
Don`t copy text!