स्थैर्य, फलटण दि.२० : जाहिरात व मॉडलिंग क्षेत्रात कार्यरत असलेली व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेली मुळची फलटण तालुक्यातील शिंदेवाडी गावची कन्या शर्मिष्ठा राम शिंदे हिने मिस लेगसी युनीव्हर्स 2020 ही जागतीक सौंदर्य स्पर्धा पहिल्या क्रमांकाने जिंकली आहे. स्पर्धेत शर्मिष्ठा शिंदे हिने भारताचे प्रतिनिधित्व केले. घानाची सौंदर्यवती त्रिसिया बासोह द्वितीय आणि इंडोनिशियाची साब्रीना आयुल हिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
मिस लेगसी युनीव्हर्स 2020 ही जागतीक सौंदर्य स्पर्धा कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. दि. 27 फेब्रुवारी 2021 रोजी या स्पर्धेचा निकाल लागला असून त्याबद्दल शर्मिष्ठाचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.
मिस इंडिया या संस्थेचेवतीने या स्पर्धेचे आयोजन फेब्रुवारी 2020 मध्ये केले होते. या स्पर्धेच्या परिक्षक श्रेया राव (मीस इंडीया रनरअप 2018) यांनी काम पाहिले.
हैद्राबादमध्ये शर्मिष्ठा शिंदे हिने कँपस प्रिंसेस फायनलीस्ट 2020 ही सौंदर्य स्पर्धा सुद्धा जिंकली आहे. शर्मिष्ठा कथ्थक व बेली डांसमध्ये पारंगत असून प्रसिद्ध मॉडेल आहे. देश परदेशातील जाहीरातीमध्ये ती सहभाग घेत असते. शर्मिष्ठा शिंदे हिने दंत वैद्याचा कोर्स पुर्ण केला असून सध्या भारती विद्यापीठ पुणे येथे प्रशिक्षण घेत आहे. शर्मिष्ठा शिंदे हिला या वेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळविण्यासाठी तिच्या आई वडिलानी प्रोत्साहन दिले आहे. व्यायाम आणि आहाराकडे तिचे विशेष लक्ष असते.
मलठण येथील रहिवासी बापुसाहेब बाळासाहेब शिंदे यांची ती नात आहे.