दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑक्टोबर २०२२ । सातारा । भारतीय स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आणि याचवेळी देशात आर्थिक विषमतेचे चित्र दिसत असताना, भारतातील सरकारी क्षेत्रातल्या नोकऱ्या कमी होत असताना,शिकूनही भारतातील लोकसंख्येच्या वाढीमुळे नोकऱ्या नाहीत म्हणून शिकलेले देखील बेकार झालेले चित्र पाहत असताना, काही ठिकाणी आशेचे दीप मात्र तेवत असताना दिसतात. त्यातीलच एक आशेचा दीप म्हणजे भारतातील,सातारा जिल्ह्यातील कुठरे येथे जन्म घेऊन जिद्दीच्या आण ज्ञानपिपासू वृत्तीने स्वतःला घडवून,अनेक जागतिक कंपन्यात काम करत जपानमधील एका Accenture या ग्लोबल कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरपदी काम करणाऱ्या सुजाता कोळेकर. जपानसारख्या शांत आणि विचारी आणि कष्टाळू लोकांच्या देशात रममाण होऊन स्वतःचे कर्तृत्व देखील गतिमान करीत आहेत. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कुठरे या लहानशा गावात जन्म घेतलेली ही मुलगी.तिचे आठवीपर्यंतचे
शिक्षण वाईला झाले. तिच्या वडिलांची बदली रायगड जिल्ह्यात,पेण तालुक्यातील जोहे नावाच्या लहान खेड्यात झाली. तिथे व्यवसाय शिक्षण देणारी शाळा होती.पण त्या शाळेत एकही मुलगी नव्हती,अशा वेळी सुजाताच्या शिकण्याच्या जिद्दी स्वभावामुळे व वडिलांना देखील मुलीला कर्तबगार बनवायचे असल्यामुळे,मुलांच्या शाळेत ती आठवी ते दहावी अशी तीन वर्षे शिकली. दहावी नंतर ती पुण्याला शासकीय तंत्र निकेतन मध्ये डिप्लोमा करण्यासाठी आली. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांची जडणघडण व संस्कारी बनवणाऱ्या विद्यार्थी सहाय्यक समितीच्या मुलींच्या वसतिगृहात तिने शिक्षण घेतले. स्वावलंबन ,स्वच्छता ,समानता ,श्रमप्रतिष्ठा इत्यादी मुल्ये स्वतःच्या
आचरणात आणून तिने पुण्यातील डिप्लोमा शिक्षण पूर्ण केले.पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळी येथील भाषा शिक्षण संस्थेत गेल्यावर त्यांना जपानी भाषा ही चित्रमय असल्याचे कळले. आपल्याला चित्रकला येते त्यामुळे ही भाषा समजून घ्यायची असे ठरवून परदेशी जपानी शिकण्याचा ध्यास तिने घेतला.मुलीची जपानी शिकण्याची तळमळ पाहून तिच्या वडिलांनी परवानगी दिल्याने,तिने जपानी भाषेचे शिक्षण मनापासून पुण्यात घेतले. शासकीय तंत्र निकेतन पुणे इथे इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकॉम डिप्लोमा केल्यानंतर तिने पुण्याबाहेर कॉम्पुटर अभियांत्रिकी शिक्षण घेतले. मात्र शनिवार आणि रविवारी ती पुण्याला येऊन जपानी भाषा अभ्यास करत राहिली. इंजिनिअरिंगचा
निकाल लागेपर्यंत एका कॉम्पुटर इन्स्टिट्यूटमध्ये तिने काम केले.तिची मनस्वी अभ्यास करण्याची वृत्ती पाहून तेथील संचालकांनी तिला भागीदार होण्याची संधी दिली.वडिलांनी तिला ‘घरातील इतर भावंडे शिकत आहेत, त्यामुळे तुला आम्ही मदत करू शकत नसलो तरी तुझ्याकडून आम्हाला कसल्याची पैशाची अपेक्षा नाही तू हा व्यवसाय करू शकतेस’ असे म्हणून साथ दिली.या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीत अमेरिका,भारत ,जपान येथील ग्राहक तिला मिळाले. तिने जपानी भाषा शिकायचे सोडले नाही.भाषा ही सतत शिकण्याची गोष्ट आहे हे तत्वज्ञान तिला चिंतनातून प्राप्त झाले. या कंपनीचे काम करताना खूप संधी मिळाल्या.लग्न झाल्यावर तिने ही कंपनी सोडली तरी
चेन्नई इथे राहून तिने एका कंपनीचा बिझिनेस प्लॅन लिहिण्यासाठी तिने २००४ ला जपानला उड्डाण केले. तिथे जपानी कंपनीत एक वर्षे काम केले.जपानी माणसे व्यवसाय कसा करतात हे ज्ञान तिने आकलन करून घेतले. AXA Insurance व वर्कस्कोप कंपनीसाठी काम करीत ती ७ वर्षे जपानमध्ये राहिली. नंतर ती भारतात आल्यावर SYNTEL कंपनीत तिचा अमेरिकन ग्राहकांशी सबंध आला.तसेच तिने कॉग्नीझंट आणि कॅप जेमिनी या कंपन्यात उच्च पदावर काम केले. दरम्यानच्या काळामध्ये जपानशी पुन्हा तिचा सबंध येत गेला.त्यामुळे जपानमध्ये सतत जाणेयेणे सुरु झाले. जपान मध्ये तिने जपानी भाषेची लेवल २ पर्यंतचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला.जपानी भाषा
अशी आत्मसात केली की तिचे उच्चार,भाषेचा ओघवतेपणा,वाक्र्प्रचार पाहून मूळ जपानी माणूस देखील अचंबित होऊ लागला. देदिप्यमान यश मिळवण्यासाठी हृदयातील आग महत्वाची असते हे जाणून नाविन्याचा ध्यास तिने घेतला आणि तिची जिज्ञासा तिला पुढे पुढे कौशल्य मिळवून देत गेली. दुर्दम्य महत्वाकांक्षा आणि त्यासाठी जीवानिशी प्रयत्न तरीही मनाचे समतोलपण तिने कायम ठेवले. जपानी भाषेची परीक्षा मला मनापासून द्यायची आहे हे जाणून तिने ठरलेले लग्न पुढे ढकलले.अशी ही सुजाता म्हणजे एक ध्यासपर्व आहे.व्यवसाय प्रशिक्षणासाठी टोकियो इथे गेल्यानंतर ती गप्प राहिली नाही.तिने मेलबर्न विद्यापीठातून एम.बी.ए .केले. पुण्यात पुन्हा आल्यावर
एशियन लों स्कूल मध्ये सायबर कायद्याचे शिक्षण तिने घेतले.म्हणूनच तिने सतत ज्ञान क्षेत्रात स्वतःस सक्षम केले आहे.तिला व्यवसाय क्षेत्रात काम करायला घरातून सर्व कुटुंबीय यांचा पाठिंबा मिळाला.स्त्री म्हणून अनेकांशी संवाद करताना तिला कोणाची आडकाठी असत नाही. संस्कृतीची विनाकारणची बंधने तिच्यावर कुणी लादत नाही. तिचे व्यावसायिक व्यक्तिमत्व असले तरी प्रेम,माणुसकी आस्था,तिने सोडलेली नाही.सामाजिक जाणीव तिच्या अंत:करणात सदोदित आहे.आपलयाला आधार देणारी विद्यार्थी सहाय्यक समिती या मातृसंस्थेबाद्द्ल तिला आदर आहे.आपल्या वसतिगृहात शिकलेल्या सुवर्णाताई या मावळात शाळेत शिक्षक आहेत,त्यांच्या शाळेला आपल्या व्यावसायिक सह्संबंधातून त्यांनी २५ अद्ययावत संगणक संच देऊन लर्निग लॅब उभी केली आहे. ग्रामीण भागातील
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीची कळकळ त्यांना आहे .माजी विद्यार्थिनींचा मेळावा विद्यार्थी सहायक समितीच्या वसतिगृहात घेतला त्या वेळी त्या आयोजनात पुष्पाताई ,मनीषा ,सुनिता ताई,अलकनंदा ताई यांच्याबरोबर त्या अग्रणी राहिल्या आहेत.आकाश कंदील बनवण्याच्या प्रशिक्षणात स्वतःच्या मुलीला सहभागी करून त्या मुलीलाही सामाजिक समायोजन कसे करावे हे एकपरीने शिकवत राहिल्या. एकवीरा विद्यालय कार्ल येथील जवळ जवळ ३० विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च त्या स्वतः आणि त्यांचे सहकारी मिळून करत आहेत लोकांच्या बदलत्या गरजा ,बदलते तंत्रज्ञान यावर त्या नजर ठेवून असतात.जवळपास ३० विविध देशात त्यांनी प्रवास केला तरी जपानमध्ये त्या रमल्या आहेत. देशोदेशीच्या विविध संस्कृतीचा अभ्यास त्या करतात. इंद्र नुयी,या पेप्सिकोचे सी.ई.ओ यांचा प्रभाव त्यांच्यावर आहे. जी गोष्ट मनापासून आवडते तिच्यावर मरेपर्यंत प्रेम करणे हे यशाचे सूत्र असते. मराठी तरूण तरुणी यांना जपानी भाषेत करिअर करावे यासाठी दहा हजार विद्यार्थ्यांना जपानी भाषा शिकण्यासाठी प्रवृत्त करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. त्यांचे कर्तृत्व पाहून मला आठवण होते ती तथागत गौतमबुद्ध यांना खीर देऊन जीवनदान देणाऱ्या सुजातेची. आपली ही सुजाता कोळेकर आपल्या मायभूमीतील अनेक तरुणांना जपानी भाषा शिकण्याची खीर देऊन त्यांचे करिअर तर घडवीत आहेच पण विवेकी ,विचारी,स्वावलंबी ,सर्जक असे नवे बुद्ध घडवीत
आहे.तिला जपानी माणसाने वाकून नमस्कार करावा तसाच मी करतो ,कारण माझ्या देशातल्या अनेकांना ती जीवनाची नवी वाट दाखवत आहे.