किन्हईमध्ये शाखा अभियंत्याची कार्यालयातचगळफास घेऊन आत्महत्या; महावितरण कंपनीत खळबळ 

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, कोरेगाव, दि.१४ : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या किन्हई शाखा कार्यालयात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या सुरज सुधीर देसाई या २६ वर्षीय युवकाने शनिवारी रात्री स्वत:च्या कार्यालयात गळफास घेऊन आत्हमत्या केली. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या अभियंते व कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, दिवसभर कंपनीचे वरिष्ठ अभियंते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी ठिय्या मांडून होते. सायंकाळी देसाई कुटुंबीय आल्यानंतर मृतदेह खाली घेण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी कोरेगावच्या शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आला.

याबाबत पोलीस ठाण्यातून आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, वाठार स्टेशन उपविभागीय कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात किन्हई येथे शाखा कार्यालय असून, तेथे कनिष्ठ अभियंत्याची नेमणूक आहे. गारगोटी, जि. कोल्हापूर येथील शेतकरी कुटुंबातील विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झालेला युवक सुरज सुधीर देसाई हा काही महिन्यांपूर्वीच कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाला होता. त्याच्या चांगल्या कामाची पध्दत पाहून वीज वितरण कंपनीमध्ये कायम करण्यात आले होते.

किन्हई शाखा कार्यालयाच्या अखत्यारित येत असलेल्या ग्रामीण भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटना घडल्या होत्या, त्यामुळे देसाई हे संतप्त झाले होते. त्यांनी कर्मचार्‍यांना देखील दिवसा आणि रात्री गस्त घालण्याबाबत सूचना दिल्या होत्या. कामामध्ये अत्यंत प्रामाणिक असलेले देसाई हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्येतून वाटचाल करत होते. शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचा मोबाईल बंद होता. कोरेगावात एकत्रित राहत असलेले त्यांचे रुम पार्टनर्स त्यांच्याशी संपर्क करत होते, मात्र संपर्क होऊ शकत नव्हता.

रविवारी सकाळी किन्हईतील शाखा कार्यालय उघडल्यानंतर सुरज देसाई यांनी कार्यालयातच गळफास घेतल्याचे दिसून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. किन्हई गावासह कार्यालयाच्या अखत्यारित येत असलेल्या ग्रामीण भागामध्ये देसाई यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी कार्यालय परिसरात गर्दी केली होती. कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्यासह सातारारोड पोलीस औट पोस्टचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांनी तातडीने किन्हई येथे धाव घेतली. आपल्या कर्मचार्‍यांसह साळुंखे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, तेथे एक चिठ्ठी मिळून आली आहे. पोलीस मुख्यालयातून फॉरेन्सिक विभागाचे पथक किन्हई येथे दाखल झाले असून, त्यांनी कार्यालय परिसराची अत्यंत बारकाईने पाहणी करुन, नमुने जमा केले आहेत. 

सायंकाळी ५.३० च्या सुमारास गारगोटीहून वडील सुधीर देसाई यांच्यासह कुटुंबीय व नातेवाईक किन्हई येथे दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत मृतदेह खाली काढण्यात आला. त्यानंतर तो कोरेगावच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे तपास करत आहेत.

वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांची गर्दी

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सातारा जिल्हा अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील माने, उपकार्यकारी अभियंता उत्तम मंचरे (वाठार स्टेशन), अभिजित महामुनी (कोरेगाव) यांच्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून सहाय्यक अभियंते, शाखा अभियंत्यांनी किन्हई येथे गर्दी केली होती.

चिठ्ठी सापडली, जाबजबाब नोंदविणार : गणेश किंद्रे

किन्हई येथे आत्महत्या केलेल्या सुरज देसाई यांची चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. देसाई कुटुंबीय सायंकाळी उशिरा आले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे. पोलीस मुख्यालयातून आलेल्या फॉरेन्सिक विभागाने नमुने जमा केले आहेत. कुटुंबीय, वीज वितरण कंपनीतील अभियंते आणि कर्मचार्‍यांचे जाब जबाब नोंदविले जाणार आहेत, त्यानंतर आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकणार आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!