दैनिक स्थैर्य | दि. 27 जानेवारी 2025 | फलटण | फलटण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्तोपंत शिंदे व फलटण पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ. नंदा दत्तोपंत शिंदे यांचे सुपुत्र सुहास शिंदे यांनी इथेनॉल क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बँकॉक येथे झालेल्या “शुगर अँड बायो एनर्जी एशिया कॉन्फरन्स २०२५” मध्ये मानाचे स्थान मिळवले आहे. सुहास शिंदे यांची कंपनी, “पायोनियर केम सोल्युशन”, अगदी अल्पावधीतच भारतासह परदेशातही त्यांच्या कामाचा ठसा उमटवलेली आहे.
सुहास शिंदे यांनी सन २०१६ साली “पायोनियर केम सोल्युशन” ही स्वतःची कंपनी सुरू केली होती. या कंपनीमार्फत पेट्रोलमध्ये मिश्रित करावयाच्या “फ्युल इथेनॉल” प्रकल्पाचे डिझाईन इंजिनियरिंग आणि प्रकल्प उभारणी करून देण्याचे काम केले जाते. याशिवाय, कंपनीमार्फत “बायोसीबीजी प्रकल्पाची” उभारणी करून दिली जाते, ज्यामुळे पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे.
बँकॉक येथे झालेल्या “शुगर अँड बायो एनर्जी एशिया कॉन्फरन्स २०२५” मध्ये सुहास शिंदे यांना “बेस्ट परफॉर्मन्स इन इंडियन इथेनॉल सेक्टर” हे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. हे पारितोषिक मिळाल्याने सुहास शिंदे यांच्या यशाबद्दल विविध क्षेत्रातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
सुहास शिंदे म्हणाले की, “वडिलांचे आशीर्वादाने मी घेतलेली अथक परिश्रम यातून हे यश संपादन करता आले.” त्यांचे यश भारतासह परदेशातही ओळखले जात आहे, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण समाजाला अभिमान वाटतो.