सुहास राजेशिर्के म्हणजे ’नाव मोठं अन लक्षण खोटं’ – अशोक मोने यांचा पलटवार; कुंभकर्णी झोपेतून जागे होण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ सप्टेंबर २०२१ । सातारा । गेल्या दोन वर्षात सातारा शहरात कोरोनाचे थैमान सुरु होते. त्यावेळी आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून जागोजागी सॅनिटायझरची फवारणी करत होतो. पालिकेत सत्ता असतानाही तम्ही साधं एक आयसोलेशन सेंटर सुरु करू शकला नाहीत हीच का तुमची सातारकारांबद्दलची बांधिलकी? तुमचं म्हणजे ’नाव मोठं अन लक्षण खोटं’ असं आहे, असा जबरदस्त पलटवार विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी माजी उप नगराध्यक्ष सुहास शिर्के यांच्यावर केला. कुंभकर्णी झोपेतून जागे व्हा मग कळेल, सातार्‍यात काय चाललंय ते, असा टोलाही मोने यांनी लगावला आहे.

कोरोना महामारीत तुम्ही सत्ताधार्‍यांनी काय दिवे लावले, हे सगळ्या जनतेला माहिती आहे. सर्वत्र कोरोना सेंटर सुरु झाली पण, पालिकेकडे निधी आणि जागा असतानाही सातारा शहरात साधं एक आयसोलेशन सेंटर तुम्हाला सुरु करता आलं नाही, हेच तुमचं कर्तृत्व. उपनगराध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यांनतर शिर्के तुम्ही कुंभकर्णी झोपेत गेलात. अजूनही तुम्हाला जाग आलेली नाही. कोण चमकोगिरी करतंय आणि कोण सातारकारांसाठी पळतंय, हे सगळं सातारकर उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. निवडणूक जवळ आल्याने केवळ सत्तेच्या हव्यासापोटी आता बॅनरबाजी करून सातारकरांना भुलवायचा नेहमीचा तुमचा डाव सुरु झाला आहे. ’खोटं बोल पण रेटून बोल’ हा तुमचा अजेंडा सातारकरांनी पुरता ओळखला आहे. राजेशिर्के नाव लावणार्‍या सुहास यांना स्वतःचा वॉर्ड कुठे आणि कसा आहे हे तरी माहिती आहे का? असा वास्तववादी सवाल मोने यांनी उपस्थित केला आहे.

कोरोना काळात सातारकरांना वार्‍यावर सोडून तुम्ही गायब झाला आणि म्हणे आम्ही फिल्डवर होतो. किमान आयसोलेशन सेंटर तरी सुरु होईल, हि सातारकरांची माफक अपेक्षा सुद्धा तुम्हाला पूर्ण करता आली नाही आणि निघाले दिवे लावायला. केवळ नावात राजे असून चालत नाही, त्यासाठी जनतेची सेवा करावी लागते, जी तुम्हाला कधी जमली पण नाही आणि सजमली पण नाही, त्यामुळे फार अक्कल पाजळून साळसूद असल्याचा आव आणू नका. उपाध्यक्ष असताना काय दिवे लावले आणि कोणते उद्योग केले, त्याचा बुरखा फाडावा लागेल, असा इशारा मोने यांनी राजेशिर्के यांना दिला आहे. तुमची बुद्धिमत्ता किती आणि तुमचा बोलविता धनी कोण हे तुमच्या पत्रकावरून सिद्धच झाले आहे.

निवडणुकीपुरता जनतेचा कळवळा आणणारे तुम्ही, विकासाच्या आणि समाजसेवेच्या गप्पा मारणं आता बंद करा. गेल्या साडेचार- पावणेपाच वर्षात कोणते आणि कसले दिवे सातार्‍यात लावले, कसला ’प्रकाश’ पडला याचा हिशोब सातारकरांना देण्याची वेळ आली आहे. म्हणूनच तुमची पळता भुई थोडी झाली आहे. तुमच्या शो बाजीला आणि थापेबाजीला सातारकर कदापि भुलणार नाहीत, याचे भान ठेवा आणि मग खुशाल पत्रकबाजी करा, असा टोमणाही मोने यांनी मारला आहे.


Back to top button
Don`t copy text!