दैनिक स्थैर्य । दि. ०९ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध कृषि योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना कृषि सेवा उपलब्ध व्हावी यासाठी कृषि विभागाचे कामकाज एका छताखाली आणण्यासाठी पुणे येथे कृषि भवन उभारण्यात येत आहे. कृषि भवनाच्या कामाला गती देवून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करावा, अशा सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.
मंत्रालयात कृषि मंत्री श्री.भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील कृषि भवनाच्या बांधकाम आराखडासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आधिकारी उपस्थित होते.
राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र आणि राज्यशासनाच्या कृषि योजनांची सेवा आणि माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी आणि प्रशासकीय कार्यालये कामकाजाच्या दृष्टीने एकाच ठिकाणी आणल्यास कामाला गती प्राप्त होईल. त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कृषि भवनाचे काम कालमार्यादेत पूर्ण करावे, असेही कृषिमंत्री श्री.भुसे यांनी सांगितले.