
दैनिक स्थैर्य । 7 ऑगस्ट 2025 । सातारा । सत्तेत आहेत त्यांना शेतकरी प्रश्नाचे काही समजत नाही, तर विरोधकांना कळूनही ते काहीच बोलत नसल्याची आज स्थिती आहे. शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ऑगस्ट क्रांतिदिनी शनिवारी (दि. 9) भिगवन (ता. इंदापूर) येथे ऊस व दूध परिषदेचे आयोजन केल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.या वेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल घराळ, विवेक कुराडे, पदाधिकारी उपस्थित होते.
रघुनाथ पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात ऊस पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, त्याचा उत्पादन खर्च व मिळणारा दर याचा मेळ बसत नाही. यापूर्वी साखर कारखानदारांना शेतकरी संघटनांनी ऊस दराच्या प्रश्नावर गुडघे टेकायला लावले होते. मात्र, याच कारखानदारांनी पुढे शेतकरी संघटनांत फूट पाडत एफआरपीचे नवे राजकारणसुरू केले.त्यामुळेच उत्पादन खर्च वाढवूनही तुलनेने कारखानदार तेवढे पैसे देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. इंदापूर येथे होणार्या य परिषदेत शेतमालावरील निर्यातबंदीकायमस्वरूपी उठवावी, संपूर्ण कर्ज, वीजबिल माफी द्यावी, उसाला पहिला हप्ता पाच हजार रुपये प्रतिटन द्यावा, साखर व इथेनॉल कारखान्यासाठीची 25 किलोमीटर हवाई अंतराची अट काढावी, वन्यप्राणी संरक्षण कायदा, गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करावा, गाईच्या व म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर दर पेट्रोल व डिझेलच्या दराएवढा मिळावा, या मागण्यासांठी ही परिषद होईल. शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. डॉ. चंद्रकांत कोलते यांची या वेळी प्रमुख उपस्थिती असेल.
रघुनाथदादा म्हणाले, कारखानदारांनी आमदारकी, खासदारकीचे आमिष दाखवून शेतकरी संघटनांत फूट पाडली. त्यामुळे एफआरपीचे नवे राजकारण सुरू झाले. राजू शेट्टी आमदार, खासदार होण्यापूर्वी एफआरपीची रक्कम दुप्पटीने वाढत होती. त्यानंतर मात्र संघटनेच्या फुटीचा फायदा कारखानदारांनी घेतला. एफआरपीत दुप्पट वाढ होण्याऐवजी नगण्य वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.