
दैनिक स्थैर्य । दि. २१ मे २०२२ । फलटण । चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेला किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना बंद असल्याने एक लाख टनापेक्षा जास्त ऊस तेथे शिल्लक असल्याचे निदर्शनास आणून देत श्रीराम, फलटण आणि श्रीदत्त, साखरवाडी बंद असते तर येथील ऊस उत्पादकांची काय अवस्था झाली असती याचा विचार करा, असे सांगून अशी वेळ परतवून लावून या तालुक्यातील ऊस उत्पादक व कामगारांचे हित जपण्याची जबाबदारी आम्ही योग्य पद्धतीने निभावल्याचे महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

विडणी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, ग्रामपंचायत फंड, व्यापार संकुल डिपॉझीट वगैरे विविध मार्गाने उपलब्ध झालेल्या सुमारे ६ कोटी रुपयांहुन अधिक निधीतून उभारण्यात येत असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांचे भुमीपूजन व उदघाटन समारंभात अध्यक्ष स्थानावरुन मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आ. दिपकराव चव्हाण, मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नितीन भैय्या भोसले, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेडे, सरपंच रुपाली अभंग, उपसरपंच आशा मदने, नितीन शेडे, मारुती नाळे, ओंकारा ड्रायव्हींग स्कूलचे हणमंतराव तथा आप्पा टेंबरे, जगन्नाथ बुवा नाळे, ज्ञानेश्वर दिघे, सहदेव शेंडे, सचिन भोसले, उत्तमराव नाळे, सर्जेराव नाळे, सहदेव बागडे, राजाभाऊ पवार, टेंबरे, शरदराव कोल्हे, संतोष खटके, संभाजी निंबाळकर, अमोल नाळे, हणमंतराव तथा आप्पा टेंबरे, अभंग, कुंडलिक अभंग, अशोक काका पवार, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार, पोलिस पाटील सौ. शितल नेरकर, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सहाय्यक अभियंता सुनिल गरुड यांच्यासह विडणी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, तरुणवर्ग उपस्थित होता. ३० वर्षांपूर्वी राजकारण आणि समाजकारणात आम्ही तिघे भाऊ प्रत्यक्ष सहभागी झालो, तेंव्हापासून विडणी गावाचा सतत सक्रिय पाठींबा लाभल्याचे नमूद करीत विडणी गाव अन राजघराण्याचे पुर्वजांपासून जिव्हाळ्याचे संबध असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. विडणी गाव तालुक्याच्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर असून फलटण शहर वाढत आहे, विडणी फलटण एक होण्यास फार अवधी नसल्याने भविष्यातील २० वर्षाचा भौगोलिक विचार करुन गावात विकासकामे करावीत अशी अपेक्षा व्यक्त करताना शासकीय योजना व निधीच्या तरतुदींमध्ये आपण कधीच मागे राहिलो नाही यापुढेही विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट शब्दात दिली.
फलटण तालुक्यात कृष्णेचे पाणी पोहोचल्याने संपूर्ण तालुका बागायत होत असताना योग्य नियोजन करुन एकरी उत्पन्न वाढ आणि योग्य बाजार पेठ या माध्यमातून शेती फायदेशीर कशी होईल याकडे अधिक लक्ष देण्याची गरज नमूद करीत त्यासाठी विडणीकरांकडून योग्य मार्गदर्शन घ्या असे आवाहन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यानी केले. बारामती शहर व तालुक्याचा सर्वांगीण विकास खा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पवार घराण्याच्या कर्तृत्वामुळे घडला असल्याचे नमूद करीत पवार कुटुंबीयांनी बारामतीत विकासाची संस्कृती रुजविण्याचे काम केले आहे, फलटण शहर व तालुक्यात ज्यांच्या माध्यमातून विकास प्रक्रिया राबविण्याचा यशस्वी प्रयत्न झाला, त्यांनाच मतदान करु अशी भावना रुजविण्याची गरज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्टपणे नमूद केली आहे.
आ. दिपकराव चव्हाण म्हणाले, श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे यांच्या माध्यमातून तालुक्यात भरघोस विकास निधी उपलब्ध होत असतो तथापि या गावाचा विस्तार मोठा असल्याने येथे विकास कामे करेल तेवढी कमीच पडतात मात्र प्रत्यक्षात विडणी गावाचा चेहरा मोहरा बदलत चालला हे विकास कामे बोलतात. डॉ. बाळासाहेब शेंडे यांना श्रीराम कारखाना चेअरमन पदाची संधी लाभताच त्यांनी संधीचे सोने करुन गेली १५ वर्षे म्हणजे सलग ३ टर्म कारखान्याचे चेअरमन पदाची जबाबदारी चागल्या पध्दतीने सांभाळली आहे. ४५ वाडीवस्तीचे विडणी गांव भविष्यात संपूर्णपणे डांबरी रस्याने जोडण्याचे स्पष्ट आश्वासन यावेळी आ. दीपकराव चव्हाण यांनी विडणीकरांना दिले. गेली २०/२५ वर्ष फलटण तालुक्यात सर्वांगीण विकासाची कामे सुरु असून फलटण तालुक्यास एक रुपाया निधी आतापर्यंत कमी पडू दिला नाही, यापुढेही निधीची कमतरता भासणार नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले. माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांनी गिरवी गांवात भरपूर विकास कामे केली होती, श्रीमंत रामराजे यांनी विडणीकरांना विडणीची गिरवी करु असा दिलेला शब्द पाळून येथे विकास कामे केली आहेत, ४५ वाडी वस्त्यांचे विडणी हे फलटण तालुक्यात एकमेव गाव असल्याने या गावास अधिक विकास निधी द्यावा लागत असल्याचे निदर्शनास आणून देतानाच निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व राजेगटाला भरघोस मताधिक्य विडणी गावातच लाभत असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
श्रीराम, फलटण आणि श्रीदत्त, साखरवाडी या साखर कारखान्यांना फलटण तालुक्याबाहेरुन ऊस येत आहे. श्रीराम आगामी काळात प्रतिदिन दहा हजार मेट्रीक टनाचे गाळप करणार आसल्याचे नमूद करीत यापुढे वेळेवर ऊस तोडींची अडचण येणार नाही या दोन्ही कारखान्यांनी ऊस पेमेंट बाबत कधीच तक्रार येऊ दिली नाही एफ आर पी प्रमाणे संपूर्ण पेमेंट वेळेवर बँक खात्यात जमा करण्यात दोन्ही कारखाने आघाडीवर आहेत आता गाळप क्षमता वाढल्यानंतर कसलीच तक्रार राहणार नसल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रमुख अतिथी यांचे सत्कार केल्यानंतर प्रास्ताविकात डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी विकास कामांचा आढावा घेतला. वीस वर्षापूर्वी विडणीमध्ये आम्ही विकास कामांचे एकवीस नारळ फोडून रेकॉर्ड केले होते, तेच रेकॉर्ड आज सुमारे ६ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विकास कामांचे ७१ नारळ फोडून, विविध विकास कामांची उदघाटने व भुमीपूजन करुन आम्हीच मोडले असल्याचे नमूद करीत गेल्या ३ वर्षात गावात १९ कोटी रुपायांची विकास कामे केली असल्याचे निदर्शनास आणून दिले. गावासाठी पद प्रतिष्ठा न मानता फक्त गावाच्या विकासासाठी वाहून घेतले आहे. गावाचा विकास कोण करतय हे गावाने पाहिले आहे, आता एक रुपायांचे योगदान गावाच्या विकासासाठी नसणारे विरोधक मोबाईलवर सोशल मिडीयावर मेसेज करुन विकास होत नसल्याचे सांगतात हे चुकीचे आहे. या पुढे जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी दिला.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याने आज अखेर ऊस उत्पादकांची सर्व बिले अदा केली आहेत. कारखाना सपूर्ण कर्जमुक्त झाला असून आगामी काळात गाळप क्षमता वाढ व अन्य विकास कामे गतीने पूर्ण करुन राज्यातील एक आदर्श साखर कारखाना म्हणून श्रीरामाला पूर्व वैभव प्राप्त करुन देण्याची ग्वाही यावेळी डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी दिली.