निंबळक येथे शेजाऱ्याने पेटवलेल्या ‘पाचटी’च्या आगीत अडीच एकर ऊस जळून खाक! दोन लाखांचे नुकसान; दोघांवर गुन्हा दाखल


निंबळक (ता. फलटण) येथे शेजाऱ्याने उसाची पाचट जाळताना कोणतीही काळजी न घेतल्याने शेजारील शेतकऱ्याचा अडीच एकर ऊस जळून खाक झाला आहे. यात तब्बल २ लाख रुपयांचे नुकसान झाले असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 3 मार्च : निंबळक (ता. फलटण) गावच्या हद्दीत एका शेतकऱ्याने आपला ऊस तुटून गेल्यानंतर शेतातील उसाची पाचट जाळताना मोठा निष्काळजीपणा केल्याने, या आगीची झळ शेजारील शेतकऱ्याच्या उभ्या ऊस पिकाला बसली आहे. वाऱ्यामुळे आग पसरून शेजारील शेतकऱ्याचा तब्बल अडीच एकर ऊस जळून खाक झाला असून यात अंदाजे २ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई देण्यास नकार दिल्याने फलटण ग्रामीण पोलिसांत याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नारायण गणपत पवार (वय ६३ वर्षे, व्यवसाय शेती, रा. निंबळक, ता. फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण पवार यांची निंबळक गावच्या हद्दीत गट नं. १०९ मध्ये शेतजमीन असून, त्यात त्यांनी उसाचे पीक घेतले आहे. त्यांच्या शेताच्या शेजारीच सतीश महादेव बनकर यांची शेतजमीन आहे.

दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सतीश व अरुण बनकर यांच्या शेतातील सुमारे ४ एकर ऊस तुटून गेला होता. त्यानंतर दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास त्यांनी उरलेल्या पाचटीला आग लावली.

कोणतीही खबरदारी न घेतल्याने आग पसरली

पाचट पेटवताना सतीश महादेव बनकर आणि अरुण महादेव बनकर यांनी ती बांधापर्यंत बाजूला न सारता, जाणीवपूर्वक आग लावली. त्यांनी योग्य ती काळजी व खबरदारी न घेतल्याने आणि त्यावेळी जोराचा वारा असल्याने ही आग थेट नारायण पवार यांच्या शेतात पसरली. पवार यांनी ही आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र आग विझली नाही.

२ लाखांचे ऊस पीक जळून खाक

या आगीत नारायण पवार यांच्या शेतातील दोन एकर क्षेत्रातील ‘खोडवा ऊस’ आणि अर्धा एकर क्षेत्रातील ‘सुरू लागण’ असा एकूण अडीच एकर क्षेत्रातील ऊस संपूर्णपणे जळून खाक झाला. या नुकसानीचा अंदाज सुमारे २,००,०००/- (दोन लाख रुपये) इतका आहे.

आपले मोठे नुकसान झाल्याने नारायण पवार यांनी सतीश आणि अरुण बनकर यांच्याकडे नुकसानभरपाईची मागणी केली असता, त्यांनी ती देण्यास स्पष्ट नकार दिला.

दोघांवर गुन्हा दाखल

अखेर नारायण पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून, निष्काळजीपणे पाचट पेटवून नुकसान केल्याप्रकरणी शेजारील सतीश महादेव बनकर आणि अरुण महादेव बनकर (दोन्ही रा. निंबळक, ता. फलटण) यांच्या विरुद्ध २७ फेब्रुवारी रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!