दैनिक स्थैर्य । दि. ११ मे २०२२ । फलटण । सर्वार्थाने फायदेशीर पीक म्हणून ऊसाकडे पाहिले जात असताना फलटण तालुक्यात तर कायम दुष्काळी पट्टयातही कृष्णेचे पाणी मुबलक उपलब्ध असून तालुक्यातील ४ ही साखर कारखाने गाळप क्षमता वाढीसह संपूर्ण ऊसाच्या गाळपासाठी सज्ज झाल्याने ऊसाचे क्षेत्र २० हजार हेक्टर पर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तालुक्यात पूर्व हंगामी ऊसाचे क्षेत्र सरासरी ३९६१ हेक्टर असताना ५६३१ हेक्टर क्षेत्रावर, आडसाली ऊसाचे क्षेत्र ७००७ हेक्टर आहे, सुरु हंगामी ऊसाचे क्षेत्र १८८४ हेक्टर असून ३४१२ हेक्टर क्षेत्रावर ऊसाच्या लागणी झाल्या आहेत. म्हणजे आत्ताच सुमारे १६ हजार हेक्टरहुन अधिक क्षेत्रावर ऊस उभा आहे, त्यामध्ये आणखी काही वाढ अपेक्षीत असून त्याशिवाय खोडव्याचे क्षेत्र विचारात घेता तालुक्यात ऊसाचे क्षेत्र २० हजार हेक्टर पर्यंत पोहोण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पूर्व हंगामी ऊस क्षेत्रात मोठी बांधणी तर सुरु ऊसाचे क्षेत्रात लहान (बाळ) बांधणी कामे सुरु असून संपूर्ण तालुक्यात ऊसाचे क्षेत्र पीक वाढीच्या अवस्थेत उत्तम असल्याचे दिसून आले आहे.