दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२२ । सातारा । गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना करण्यात आलेली असून या महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा या करीता ऊसतोड कामगारांची नोंदणी करुन त्यांना ग्रामसेवकांमार्फत ऊसतोड कामगार असल्याचे ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सहाकार्य करावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केलेआहे.
सातारा जिल्ह्यात साखर कारखान्यात येणारे ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत व जे सतत मागील 3 वर्ष ऊसतोड म्हणून काम करीत असतील त्यांना ग्रामसेवकांनी (संबंधित गावातील, वस्त्यांमधील तांड्यामधील, पाड्यांमधील व इतर) यांना ओळखपत्र देणे अपेक्षित आहे. काम वेळेत पूर्ण व्हावे, सुलभता यावी तसेच स्थानिक पातळीवर काही समस्या उद्भवल्यास त्याचे तातडीने निराकरण करण्यात यावे या प्रमाणे अंमलबजावणी करावी.
ऊसतोड कामगार जिल्हास्तरीय समिती तथा जिल्हाधिकारी, सातारा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये ऊसतोड कामगारांना ग्रामसेवक यांच्यामार्फत ओळखपत्र देण्याबाबत अध्यक्षांनी आदेशित केले आहे. तरी व्यवस्थापकीय संचालक, साखर कारखाने (सर्व ) जि. सातारा यांनी ग्रामसेवक यांना सहकार्य करुन ऊसतोड कामगार यांना ओळखपत्र देण्यात यावे, असेही आवाहन श्री. उबाळे यांनी केले आहे.