दैनिक स्थैर्य । दि. २८ जानेवारी २०२३ । फलटण । महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र ऊस उत्पादनात अग्रेसर आहे. ऊसापासून इथेनॉल निर्मिती करता येते. पेट्रोलपेक्षा इथेनॉलचे दर खूप कमी आहेत. पुढील काळात इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करण्यात येणार आहे. तरी साखर कारखानदारांनी इथेनॉलच्या निर्मितीसाठी आपला पुढाकार घ्यावा यातून निश्चितच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
फलटण येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे उंडवडी कडेपठार-बारामती-फलटण रस्ता चौपदरीकरण व कॉक्रिटीकरण, शिंदेवाडी-भोर-वरंधाघाट रस्ता राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व कॉक्रिटीकरणाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण आणि लोणंद-सातारा रस्ता मजबुतीकरणाचे लोकार्पण डिजिटल पध्दतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री रामराजे नाईक निंबाळकर, दीपक चव्हाण, शहाजी पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधिक्षक समीर शेख, राष्ट्रीय महामार्गाचे संतोष शेलार आदी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी सन 2014 पर्यंत 49.04 कि.मी. होती तर आता ही लांबी 858 कि.मी. झाली आहे असे सांगून श्री. गडकरी म्हणाले, आळंदी ते पंढरपूर हा बारा हजार कोटींचा पालखी मार्ग येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल. या मार्गावर वारकऱ्यांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या पालखी मार्गाचे महाराष्ट्रातील साधुंसंताच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. हा उद्घाटनाचा कार्यक्रम भव्य दिव्य असा केला जाईल.
मुंबई- बेंगलोर महामार्गावर विविध सुविधांसह औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक युवकांना मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतमालालाही चांगला भाव मिळणार यामुळे या भागातील स्थालांतर कमी होईल.केंद्र शासनाचा देशभरात रस्त्याचे जाळे निर्माण करण्यावर भर राहिला आहे.
महाराष्ट्राला ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरा आहे. संत वाङमय हे डिजिटल पध्दतीने तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून श्री. गडकरी म्हणाले, फलटण शहरांतर्गत 9 कि.मी. चा रस्ता पूर्ण केला जाईल.फलटण -दहिवडी या रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध करुन सहा महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल. तसेच लोकप्रतिनिधींनी विविध विकास कामांना निधीची मागणी केली आहे. त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
राष्ट्रीय महामार्ग महामंडळाचे काम जिल्ह्यात चांगल्या प्रकारे सुरु असल्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी यावेळी सांगितले.
खासदार श्री नाईक निंबाळकर म्हणाले, पालखी मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
पालखी मार्गासाठी जमिन संपादन केलेल्या लोकांना योग्य मोबदला देण्यात आला आहे.. माढा लोकसभा मतदार संघातील विविध विकास कामासाठी गडकरी साहेबांनी नेहमीच सहकार्य केले आहे.फलटण शहरातील विकास कामांनाही निधी मिळवा अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी आमदार सर्वश्री रामराजे नाईक निंबाळकर व शहाजी पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.