दैनिक स्थैर्य । दि.०९ फेब्रुवारी २०२१ । फलटण । पुणे – मिरज लोह मार्ग रुंदीकरण व विद्युतीकरणाचे सुमारे २ वर्षांपासून सुरु असलेले काम अंतीम टप्प्यात असून या मार्गापैकी पुणे ते आदर्की या ११० कि. मी. अंतराच्या लोह मार्गावर नुकतीच वीजेवर चालणाऱ्या रेल्वे इंजीनद्वारे घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली आहे.
पुणे – मिरज लोहमार्ग दुहेरीकरण व विद्युतीकरण दोन्ही कामे वेगात सुरु असून ती पूर्ण होताच या मार्गावर वीजेवर चालणाऱ्या इंजीनमुळे गाड्यांचा वेग वाढणार आहे, त्याचबरोबर गाड्यांची संख्याही वाढेल अशी अपेक्षा असून फलटण – लोणंद मार्गावर फलटण – पुणे – मुंबई अशी रेल्वे गाडी सुरु होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने फलटण व परिसराला प्रवाशी वाहतुकी बरोबर औद्योगिक व शेतमाल वाहतुकीची सुलभ व वेगवान सुविधा लवकरच उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.
स्वातंत्र्य पूर्वकाळात पुणे – मिरज लोहमार्ग मीटर गेज सुरु होता त्यानंतर स्वांतंत्र्यकाळात ब्रॉडगेज लोहमार्ग सुरु झाला, वाफेवरील इंजिन जावून डिझेल वर चालणारे इंजिन आले त्यामुळे लोह मार्ग वाहतूक वाढण्यास मदत झाली, परिणामी लोकांचा कल लोह मार्गाकडे वाढत राहिला.
पुणे – मिरज मीटर गेज लोहमार्ग सन १८९१ दरम्यान सुरु झाला त्यावेळी कोळशावर चालणारे वाफेचे इंजीन होते, त्यामुळे रेल्वे गाड्यांचा वेग कमी होता, परंतू रस्ते, घाटरस्ते नसल्याने रेल्वेने मोठ्या प्रमाणात ये जा होत होती. सन १९६९ दरम्यान ब्राडगेज रेल्वे लाईन सुरु झाली, पण इंजीन मात्र वाफेवर चालणारे होते. त्यावेळी रेल्वे लाईन मध्ये बदल करुन सातारारोड वळती स्टेशन बंद केली तर सातारा, शिंदवणे नवीन रेल्वे स्टेशन सुरु करण्यात आली. राजेवाडी, आंबळे, आदर्की, कोरेगाव रेल्वे स्टेशनच्या जागा बदलण्यात आल्या. त्यानंतर डिझेल इंजीनद्वारे रेल्वे वाहतूक सुरु झाल्याने गाड्यांचा वेग वाढला परिणामी प्रवाशी व माल वाहतुकीमध्ये वाढ झाली. परिणामी प्रवाशी संख्येत मोठी वाढ झाली, मात्र एकेरी रेल्वे लाईन मुळे प्रवाशी गाडयांना पोहोचण्यास वेळ लागत होता आता दुहेरी रेल्वे मार्ग आणि वीजेवर चालणाऱ्या रेल्वे इंजीनमुळे ही समस्या लवकरच दूर होणार आहे.
मिरज – पुणे लोहमार्गावर पुणे, घोरपडी, फुरसुंगी, आळंदी, शिंदवणे, आंबळे, राजवाडी, जेजुरी, दौडज, वाल्हे, निरा, लोणंद, सालपे, आदर्की, वाठार स्टेशन, पळशी, जरंडेश्वर, सातारा, कोरेगाव, रहिमतपुर, तारगाव, कऱ्हाड, मसूर, शिरवडे, शेणोली, ताकारी, भवानीनगर, किर्लोस्ककरवाडी, आदमापुर, भिलवडी, नांद्रे, माधवनगर, सांगली, विश्रामबाग, मिरज आदी रेल्वे स्थानक आहेत.
प्रतिक्रीया :
आदर्की ते पुणे लोहमार्गाची सुरुवात दि. २३ एप्रिल १८९१ रोजी झाली असून तब्बल १३१ वर्षांनंतर या ११० कि. मी. लोहमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण झाल्याने या लोहमार्गावरील रेल्वे वाहतूक अतिजलद होणार आहे. आदर्की व पंचक्रोशीतील नागरिकांना याचा निश्चितच फायदा होणार आहे.
दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर पुण्याला जाण्यासाठी दर २ तासांनी लोकल रेल्वे सेवा या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी सुरु करण्याची मागणी आम्ही लवकरच रेल्वे मंत्रालयाकडे करणार आहोत.
– सागर विलास जाधव
ग्रामपंचायत सदस्य आदर्की बुद्रुक ता. फलटण.