फलटण नगर परिषदेकडून पालखी सोहळ्याची जय्यत तयारी – मुख्याधिकारी संजय गायकवाड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ जून २०२३ | फलटण |
श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २१ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास फलटण येथील विमानतळ येथे आगमन होत आहे. फलटण नगर परिषदेमार्फत माऊलींच्या पालखी सोहळा उत्तमरित्या पार पाडण्यासाठी विविध विकासकामे केली जातात. तसेच नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची पालखी सोहळ्यातील विविध ठिकाणी नेमणूक केली जाते, अशी माहिती नगरपरिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिली.

फलटण येथील पालखी तळाव्यतिरिक्त विविध ठिकाणी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी असणार्‍या दिंड्या मुक्कामी राहतात. त्या सर्व ठिकाणी पालखी पूर्व व पालखी पश्चात स्वच्छतेचे प्रमुख नियोजन नगर परिषदेमार्फत केले जाते.

शहर स्वच्छता नियोजन
नगरपरिषदेमार्फत शहर स्वच्छतेकरीता २ स्वच्छता निरीक्षक, ६ मुकादम, १३० सफाई कर्मचारी, १५० शासनाकडील जादा कर्मचारी, २५ ठेका सफाई कर्मचारी, १६ घंटागाड्या, ४ ट्रॅक्टरट्रॉली, २ टाटा ४०७, १ टाटा ६०७, १ जेसीबी मशीन याद्वारे संपूर्ण शहर व पालखी तळाची स्वच्छता केली जाते. गतवर्षी २ ट्रॅक्टरट्रॉली, १ टाटा ६०७, १ जेसीबी मशीन, १५० शासनाकडील जादा कर्मचारी, २५ ठेका सफाई कर्मचारी जादा लावण्यात येऊन संपूर्ण शहराची पालखीपूर्व व पालखी पश्चात स्वच्छतेचे नियोजन केलेले होते. तसेच रोगराई पसरू नये, संसर्ग टाळण्याकरीता जंतूनाशक व १२ फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी केली जाते. यामुळे साथरोगाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता नगरपरिषद घेत आहे. संकलित झालेल्या कचर्‍यावर नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्प केंद्र येथे शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे.

निर्मलवारीकरीता शौचालय नियोजन
गतवर्षी निर्मलवारी करीता १ हजार शौचालये उपलब्ध करून देण्यात आली होती. यावर्षी १५०० शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही शौचालये मुख्य पालखी तळ येथे प्रत्येक ठिकाणी १०० व एका ठिकाणी २५० अशी एकूण १३०० शौचालये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उर्वरित २०० शौचालये शहर हद्दीमध्ये इतरत्र दिंड्या उतरण्याच्या ठिकाणी पुरविण्यात येणार आहेत. जाधववाडीमध्ये शौचालयांकरीता लागणार्‍या पाण्याचे नियोजन केलेले आहे. या ठिकाणी निर्मलवारी टँकर फिडींग पॉईंटची व्यवस्था केलेली आहे. एका निर्मलवारी टँकरची क्षमता २० हजार लिटर इतकी आहे. पुरेसे व मुबलक पाणी २४ बाय ७ वेळेत उपलब्ध करून दिले जाणार आहे. शौचालयांमध्ये निर्माण होणारा मैला निर्जनस्थळी खड्डा करून त्यावर जंत्रूनाशक व डिस्इंफीक्टो फवारणी करून खड्डा पूर्ववत बुजविण्यात येणार आहे. यामुळे कोणताही आजार किंवा साथरोग पसरणार नाही. तसेच शहरातील शौचालये / मुतारी साफ करण्याकरीता नगरपरिषदेने स्वतंत्र वाहनाची सोय केली आहे. यावर प्रेशरगन बसविण्यात येऊन शौचालयांची / मुतारी सफाई करण्यात येणार आहे.

पालखी तळावरील प्रकाश व्यवस्था
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पालखी तळावरील प्रकाश व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ नगरपरिषदेमार्फत करण्यात आली आहे. गतवर्षी ३ टॉवर्स, २ जनरेटर उभारून पालखी तळावर प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली होती. यावर्षी नगरपरिषदेमार्फत ६ मोठे जनसेट (३० के.व्ही. क्ष्मता) व १ जनसेट (७.५ के.व्ही. क्ष्मता राखीव तातडीची बाब म्हणून) असलेले जनरेटर पालखी तळावर प्रकाश व्यवस्थेकरीता ठेवण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त निर्मलवारीतील शौचालयांकरीता १५ पोर्टेबल जनरेटर (३.५० केव्ही क्षमतेचे) आहेत. ६ मोठ्या टॉवर्सवर फ्लड लाईट बसवून मागील वर्षीपेक्षा मोठ्या टॉवर्सवर फ्लड लाईट दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे. राखीव जनरेटरची सोय केली आहे.

फलटण शहरातील पालखी मार्ग
फलटण शहरामधून आगमन व निगमन असा एकूण ८ कि.मी. लांबीचा मार्ग आहे. पैकी ४.०० कि.मी. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. हा रस्ता सुस्थितीत आहे. फलटण नगरपरिषदेच्या मालकीच्या ४.०० कि.मी. पालखी मार्ग सुस्थितीत आहेत. रस्त्याच्या कडेचा राडारोडा, चेंबर दुरूस्ती, गटारे दुरूस्ती करून पालखी मार्गावरील बांधकाम साहित्य पूर्णपणे उचलण्यात आलेले आहे.

पाणीपुरवठा
फलटण शहराला पेठ सोमवार येथील सुधारित जलकेंद्र येथून पाणीपुरवठा करण्यात येतो. साठवण तलावाची क्षमता ५५० एमएलडी इतकी आहे. गतवर्षीपेक्षा जादा फिडींग पॉईंट उभारण्यात करण्यात आलेली आहे. सुधारित जलकेंद्र येथे ८ फिडींग पॉईंट, खजिना हौद १ फिडींग पॉईंट, भडकमकर नगर १ फिडींग पॉईंट, जाधववाडी १ फिडींग पॉईंट उभारण्यात येणार आहे. प्रतीदिनी सुमारे १३०० टँकर नगरपरिषदेमार्फत भरले जातात. पालखी तळावर ४ टँकर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालखी तळ, रिंगरोड येथे तात्पुरते नळकनेक्शन उभारणी केली जाते. तेथे २४ बाय ७ पाणीपुरवठा केला जातो.

महिलांकरीता विशेष सोईसुविधा
पालखी मुक्काम ठिकाणी महिलांकरीता दोन स्वतंत्र स्नानगृह तयार करण्यात येतात. एका वेळेस २५ महिला स्नानगृहांचा वापर करू शकतात. पालखी सोहळ्यामध्ये सहभागी असणार्‍या स्त्रियांकरीता मोफत सॅनिटरी नॅपकीन वाटप करण्यात येते. शहरामध्ये १५ ठिकाणी सॅनेटरी नॅपकीन वाटप होते. शहरामध्ये ५ ठिकाणी वेंडींग मशीन लावण्यात येतात. पालखी तळावर महिलांकरीता हिरकणी कक्षाची स्थापना करून त्यामध्ये एक महिला अधिकारी व दोन महिला कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. शहरामधील पालखी मुक्कामाच्या ठिकाणी व इतरत्र दिंड्या मुक्कामाच्या ठिकाणी महिलांकरीता ५०० राखीव शौचालये ठेवण्यात येतात. फलटण नगरपरिषदेने महिला वारकर्‍यांना निवासाकरीता पालखी मुक्कामानजीकची सामाजिक सभागृहे, बहुद्देशीय हॉल उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

अशी सर्व प्रकारची जय्यत तयारी फलटण नगरपरिषदेमार्फत करण्यात आल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!