दैनिक स्थैर्य । दि. १४ डिसेंबर २०२१ । फलटण । विडणी (ता.फलटण) येथील 77 वर्षीय विलास यशवंत बडवे यांच्यावर बारामती येथे बायपास शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. सदर शस्त्रक्रियेपूर्वी योग्य वेळी उपचार व मार्गदर्शन करणासाठी धावून आलेल्या फलटण येथील डॉ.विक्रांत रसाळ यांचे बडवे कुटूंबियांकडून विशेष आभार मानण्यात आले.
विलास बडवे यांना अचानक हृदयविकाराचा त्रास झाल्यानंतर त्यांना फलटण येथील डॉ.वल्लभ कुलकर्णी यांच्या कुलकर्णी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णाची गंभीर अवस्था लक्षात घेवून डॉ.कुलकर्णी यांनी तात्काळ डॉ.विक्रांत रसाळ यांना पाचारण केले. त्यानंतर डॉ.विक्रांत रसाळ यांनी अगदी योग्य वेळी आवश्यक उपचार करुन तातडीने पुढील बायपास शस्त्रक्रियेसाठी बारामती येथे डॉ.रमेश भोईटे यांच्याशी संपर्क साधून सुविधा उपलब्ध करुन दिली. त्यानंतर बडवे यांच्यावर भोईटे हॉस्पिटलमध्ये डॉ.कणसे यांनी बायपास शस्त्रक्रिया केली व ती यशस्वी पार पडली.
या तातडीच्या घडामोडीत डॉ.विक्रांत रसाळ यांनी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करुन तात्काळ आवश्यक त्या सर्व अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल विलास बडवे यांचे सुपुत्र तुळशीदास बडवे व प्रसाद बडवे यांनी त्यांचा यथोचित सत्कार करुन धन्यवाद दिले. यावेळी डॉ.वल्लभ कुलकर्णी, डॉ.निकम, डॉ.बाळासाहेब शेंडे यांचेही आभार बडवे कुटूंबियांनी मानले.