
दैनिक स्थैर्य । दि. २७ ऑगस्ट २०२२ । बारामती । “प्रत्येक खेळाडूंनी विविध स्पर्धा जिंकत असताना देशा साठी ऑलिंपिक पदक जिंकण्याचे आहे या इराद्याने खेळा व प्रत्येकाचे यश कौतुकास्पद आहे या शुभेच्छा देत आयर्नमॅन खेळाडूचा सन्मान हाय टेक्स्टाईल पार्क च्या अध्यक्षा सौ सुनेत्रा पवार यांनी केला (शुक्रवार 26 ऑगस्ट ) कझाकिस्तान येथे संपन्न झालेल्या आयर्नमॅन स्पर्धे मधील खेळाडूचा बारामती सायकल क्लब च्या वतीने गौरव करण्यात आला.
सायकल क्लब चे सदस्य ओम सावळेपाटील, अवधूत शिंदे,दिग्विजय सावंत, विपुल पटेल व राजेंद्र ठवरे आणि इतर खेळाडू डॉ वरद देवकाते, युसूफ कायमखाणी, अभिषेक ननवरे व मयूर आटोळे यांचा व या सर्व खेळाडूंना मार्गदर्शन व सहकार्य करणारे जलतरण प्रशिक्षक, आहार तज्ञ,शारीरिक प्रशिक्षक मदतनीस, सुरक्षा रक्षक, वाहन चालक,बोट चालक आदी सर्वांचा सन्मान सौ सुनेत्रा पवार व पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला.
180 किमी सायकल चालविणे, 42 किलोमीटर धावणे व 3.8 किमी पोहणे हे तिन्ही खेळ करत असताना कोणाचीही मदत न घेता नियम व अटी पाळून 16 तासाच्या आत पूर्ण करणे गरजेचे असताना सर्व स्पर्धकांनी वेळेच्या आत हि स्पर्धा पूर्ण केली व भारताचे नाव कझाकिस्तान मध्ये उज्वल केले हे कौतुकास्पद व आदर्शवत असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले.
बारामती सायकल क्लब च्या माध्यमातून प्रेरक मार्गदर्शन व अचूक सराव साठी प्रशिक्षण भेटल्यानेच खेळाडू आयर्नमॅन झाल्याचे पालक प्रतिनिधी अनिल सावळेपाटील यांनी सांगितले. प्रत्येक बारामती कराच्या शुभेच्छा व आशीर्वादाने हि स्पर्धा पूर्ण केली व या नंतर सुद्धा जागतिक पातळीवर अनेक स्पर्धे मध्ये आम्ही व नवीन खेळाडू सहभाग घेणार असल्याचे आयर्नमॅन प्रतिनिधी विपुल पटेल यांनी सांगितले.
सायकल क्लब च्या विविध उपक्रमाची माहिती प्रास्ताविक मध्ये निलेश घोडके यांनी दिली. बारामती तालुका बॅडमिंटन असोसिएशन च्या वतीने खेळाडूंना मानपत्र देण्यात आले. तर सूत्रसंचालन महेश जाधव व आभार ऍड श्रीनिवास वाईकर यांनी मानले.