दैनिक स्थैर्य । दि. २५ एप्रिल २०२२ । फलटण । देश परदेशात अनेक असामान्य व्यक्तींच्या मुलाखती आपण घेतल्या, त्या घेताना परिपूर्ण माहिती व सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यामुळे पत्रकार, निवेदक व मुलाखतकार म्हणून यशस्वी होता आल्याचे सुधीर गाडगीळ यांनी मुलखा वेगळी माणस या कार्यक्रमात स्पष्ट केले. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक या संस्थेला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने फलटण केंद्रातर्फे येथे आयोजित ‘मुलुखा वेगळी माणस’ या कार्यक्रमात सुधीर गाडगीळ बोलत होते. यावेळी नाशिक केंद्राचे उदयकुमार मुंगी, अजित चिपळूणकर, फलटण केंद्राचे विजय ताथवडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, सभासद आणि निमंत्रित उपस्थित होते.
आजपर्यंत आपण सुमारे ५ हजार पेक्षा अधिक असामान्य व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत, त्यामध्ये स्व. लता मंगेशकर व मंगेशकर कुटुंबीय, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, बाबासाहेब पुरंदरे, अटलबिहारी वाजपेयी, माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम, पु. ल. देशपांडे, प्रमोद महाजन, जयंत नारळीकर, माधुरी दिक्षीत, सचिन तेंडुलकर आदी दिग्गज व्यक्तींचा समावेश असल्याचे सांगतानाच यापासून आपल्याला खुप काही शिकायला मिळाले. सर्व माहिती व ज्ञान यामुळे आपण यशस्वी झाल्याचे सुधीर गाडगीळ यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व परशुरामाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले, त्यानंतर सुधीर गाडगीळ यांना स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर दाणी यांनी सर्वांचे स्वागत करुन केंद्राच्या वर्षभरातील कार्यक्रमांचा धावता आढावा घेतला. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, व्यवसायिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्या जेष्ठ व्यक्तींचा तसेच नाशिक, पुणे, जुन्नर, शिरवळ, निरा वगैरे केंद्र प्रमुखांना स्मृतिचिन्ह, शाल, बुके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी फलटण केंद्रातर्फे माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व परिचय प्रा. डॉ. सौ. माधुरी दाणी यांनी केले तर आभार विजय ताथवडकर यांनी मानले.