स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि. 14 : दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हवे ते यशही पादाक्रांत करता येते. त्यासाठी फक्त सकारात्मक विचारांची आवश्यकता असते. हे विचार आपल्या कृतीतून प्रत्यक्षात आणणार्या आसनगावातील वयाची पन्नाशी पूर्ण केलेले ज्येष्ठ नागरिक दुष्काळाच्या विरोधात दोन हात करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरले आहेत.
कोरेगाव तालुक्याचा दरवर्षी सतत दुष्काळाच्या संकटाशीच सामना. रोजगार, शिक्षणाची ददात. तरीही मनात मात्र गावाच्या विकासाचा ध्यास. स्वत:चे जीवन सावरता सावरता अख्ख्या गावाचा परिघ विकासाच्या सुगंधाने दरवळून जावा यासाठी आसनगावातील ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन मागील काही वर्षांपासून पराकोटीचे कष्ट सुरू केले आहेत. गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी दंड थोपटून कामाला लागलेले नागरिक चर्चेत आहेत.
संभाजी शिंदे, अनिल शिंदे, दत्तात्रय शिंदे, प्रभाकर शिंदे, विरसिंग शिंदे, प्रदीप शिंदे, भानुदास शिंदे, शामराव गुरव, तानाजी भोसले यांनी आपले आसनगाव हे गाव दुष्काळमुक्त करण्याचा चंग यांनी बांधला. त्यांनी संपूर्ण गावाचा सहभाग मिळविण्यासाठी जीवाचे रान केले. आसनगाव व शहापूरच्या वरील दोन पाझर तलाव खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे ठरवून त्यासाठी गावातील नागरिकांना जागविण्याचे काम त्यांनी सुरू केले. जलसंधारणच्या यज्ञात किमान सहभाग द्यावा म्हणून त्यांनी प्रत्येकाच्या उंबरठ्यावर निमंत्रणाच्या अक्षता वाटल्या. त्यासाठी दररोज पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे भर उन्हात काम करीत राहिले. त्यांच्या पुढाकाराने तलावाचे काम पूर्ण झाले. त्याला इतर ग्रामस्थांची साथ मिळाली. त्यामुळेच दुष्काळमुक्तीसाठी लढणारे जलयोद्धे ही बिरुदावली सार्थ ठरली आहे.