
दैनिक स्थैर्य । 7 मार्च 2025। फलटण । विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्य वाढवावे. पुढे बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले की, आयुष्यात काही मोठे साध्य करायचे असेल, तर कारणे देण्याचे टाळा. फक्त बाह्य देखावा नको, आतून जिद्द आणि इच्छाशक्ती हवी. स्पर्धा परीक्षांमधील संधी, योग्य अभ्यास पद्धती, वेळेचे नियोजन केले पाहिजे. विद्याथ्यार्र्नी विनोदबुद्धी जपा, गांभीर्याने जगा, चांगल्या संगतीत राहा आणि कुटुंबाला प्राधान्य द्या, स्पर्धा परीक्षांमधील यशासाठी सातत्य, मेहनत आणि योग्य रणनीतीची गरज असे प्रतिपादन एमपीएससीचे माजी सदस्य, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे माजी कुलगुरू अरुण अडसूळ यांनी केले.
येथील मुधोजी महाविद्यालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यामध्ये ते बोलत होते.
यावेळी पोलीस निरीक्षक अंकिता जाधव म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अनेक अडचणी येतात, मात्र संयम, सातत्य आणि योग्य नियोजन यामुळे आपण त्या सहज पार करू शकतो. कधीही हार मानू नका, अपयश आले तरी त्यातून शिकत पुढे जा. त्यांनी अभ्यासाचे नियोजन, नोट्स तयार करण्याचे तंत्र, उत्तर लेखन कौशल्य आणि मुलाखतीसाठी लागणारी तयारी करा. तसेच पोलीस निरीक्षक पूजा कर्पे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमीचेे संचालक विजयराज चंदनकर म्हणाले, स्पर्धा परीक्षेची निवड करताना कठोर मेहनत आणि योग्य मार्गदर्शन हवे. योग्य अभ्यास साहित्य, नियोजन, सराव परीक्षा आणि सकारात्मक मानसिकता यामुळे यश मिळवणे शक्य आहे.
प्राचार्य डॉ. पी एच. कदम म्हणाले, विद्यार्थ्यांना पदवी शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, योग्य दिशादर्शनाचे महत्त्व सांगितले. महाविद्यालयाच्यावतीने असे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कु. वैष्णवी शेंडे आणि कु. प्रज्ञा यादव यांनी सूत्रसंचालन केले. प्राची शिंदे यांनी प्रास्ताविक केले. किरण काळे यांनी आभार मानले, स्पर्धा परीक्षा समन्वयक प्रा. गिरीश पवार आणि त्यांच्या टीमने कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.