श्रीरामला पूर्ववैभवाप्रत नेण्यात यशस्वी : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर


 

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून श्रीरामाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ केला

स्थैर्य, फलटण दि. ११ : आर्थिक गर्तेत रुतल्याने बंद पडलेला श्रीराम सहकारी साखर कारखाना पूर्व वैभवाप्रत नेण्याच्या प्रयत्नात तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची साथ प्रेरणादायी ठरल्याने आपण त्यामध्ये यशस्वी झालो असून आता आपला हा कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून त्याचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुढे यावे असे आवाहन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या ६४ व्या आणि श्रीराम जवाहर सहकारी साखर उद्योगाच्या १५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ ऊसाची मोळी व गव्हाण पूजनाने आज (रविवार) श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आला. अध्यक्षस्थानी आ. दीपकराव चव्हाण होते, यावेळी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, उपसभापती सौ. रेखाताई खरात, श्रीरामचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा. चेअरमन नितीन भोसले व संचालक मंडळ, विविध संस्थांचे पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे कार्यकारी संचालक सी. डी. तळेकर, उद्योगाचे प्रोजेक्ट मॅनेजर मानसिंग पाटील व त्यांचे सहकारी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

श्रीरामचे ज्येष्ठ संचालक उत्तमराव चौधरी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. चौधरी यांच्या हस्ते कार्यक्रमापूर्वी विधीवत होम हवन करण्यात आले. प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचा सत्कार केल्यानंतर डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी प्रास्तविकात, श्रीराम सहकारी साखर कारखाना चालविणाऱ्या श्रीराम जवाहर सहकारी साखर उद्योगाने यावर्षी कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून या हंगामात ५ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस गाळपासाठी श्रीरामला देऊन सहकार्य करावे अशी विनंती केली.

फलटण तालुक्यात यावर्षी सुमारे ९ हजार हेक्टर क्षेत्रावर तुटणारा ऊस उभा असून त्यापैकी सुमारे ३५०० हेक्टर क्षेत्रातील सभासदांच्या आणि १५०० हेक्टर क्षेत्रातील गेटकेन ऊसाची नोंद आतापर्यंत श्रीराम कडे झाली आहे, त्यामुळे ५ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट गाठणे सभासद व गेटकेन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्याने सहज शक्य असल्याचे नमूद करीत श्रीरामने एफआरपी प्रमाणे संपूर्ण पेमेंट यापूर्वी दिले असून यावर्षीही त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नसल्याची ग्वाही देत संपूर्ण ऊस श्रीरामलाच देण्याचे आवाहन डॉ. शेंडे यांनी पुन्हा एकदा केले.

ऊस तोडणी वाहतुकी साठीही सक्षम यंत्रणा उभारण्यात आली असून त्यांचीही मागील सर्व देणी देऊन यावर्षीच्या हंगामासाठी सुमारे ११ कोटी रुपयांचे ऍडव्हान्स वाटप करण्यात आले असून २१८ ट्रक ट्रॅक्टर, ३१० अंगद आणि २३२ बैलगाडी ऊस वाहतुकीसाठी उपलब्ध होणार असून त्याप्रमाणात तोडणी कोयते मजूर उपलब्ध होणार असल्याचे निदर्शनास आणून देत नियमाप्रमाणे लागण तारखेनुसार ऊस तोडणी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे डॉ. शेंडे यांनी निदर्शनास आणून दिले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!