स्थैर्य, फलटण, दि. ६ : फलटण शहरांमध्ये सध्या भुयारी गटार योजनेचे कामकाज जोरात सुरू आहे. परंतु भुयारी गटाराचे काम हे संपूर्णतः निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. तरी भुयारी गटार योजनेच्या कामाची क्वालिटी कंट्रोल मार्फत तपासणी झाल्यानंतरच फलटण शहरांमधील रस्त्यांची कामे सुरू करण्यात यावीत, अश्या सूचना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिले.
सातारा येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिशा कमिटीच्या मीटिंग दरम्यान भेट घेतली. या भेटीमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणमधील भुयारी गटार योजनेच्या कामाची वस्तुनिष्ठ माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिली. यावेळी माजी सनदी अधिकारी व दिशा कमिटीचे सदस्य विश्वासराव भोसले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अशोकराव जाधव, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, दिशा कमिटी सदस्य डॉ. प्रवीण आगवणे यांची प्रमुख उपस्थित होती.
फलटण शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. भुयारी गटार योजनेचे काम सुरू करत असताना सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होत आहे. भुयारी गटार योजनेचे कामकाज हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. तरी भुयारी गटार योजनेच्या कामाची तपासणी ही क्वालिटी कंट्रोल विभागामार्फत झाल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची कामे करण्यात यावी, अश्या सूचना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिल्या.
नगरसेवक अशोकराव जाधव यांनी भुयारी गटार योजनेच्या निकृष्ट कामकाजाबाबत फलटण नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये बहुतांशवेळा आवाज उठवला असून परंतु सत्ताधारी मंडळींकडे असलेल्या बहुमतावर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम केलेले आहे. फलटणकरांना नाहक त्रास देण्याचे षडयंत्र हे सत्ताधार्यांनी रचलेले आहे. कंत्राटदाराच्या फायद्यासाठी भुयारी गटार योजनेचे काम करत ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून याची जिल्हाधिकारी महोदय यांनी दखल घ्यावी, अशी मागणी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी यावेळी केली.