सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे : पराक्रमाचे स्थळ दर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । आपला शिवकालीन इतिहास तेजस्वी आहे. पूर्वजांच्या रक्ताचा, स्वाभिमानाचा, शौर्याचा, निष्ठेचा आणि शहाणपणाचा वारसाहक्क आपल्याकडे आहे. त्यांचा इतिहास जर आपण विसरत चाललो तर वर्तमानकाळापेक्षाही आपला भविष्यकाळ काजळलेला दिसेल हे सांगायला नको. “शिवरायांचा सिंह पडला समरांगणी मराठा गडी यशाचा धनी” असा गौरव इतिहासाच्या पानापानात सुवर्णाक्षराने शिवछत्रपतींच्या ज्या सुभेदाराचा झाला आहे त्या नरव्याघ्र नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा महाराष्ट्राला आणि मराठी मनाला आजवर सतत स्फूर्तिदायी ठरत आली आहे. नरवीर तानाजींनी भावनेपेक्षा आणि स्वतःच्या कुटुंबाच्या कर्तव्यापेक्षा स्वराज्याची किंबहुना राष्ट्रकार्याची हाक ऐकली आणि हे करताना स्वामीकार्यासाठी स्वतःच्या रक्ताचा सडा शिंपडून प्राण अर्पण केले. अशा नरवीर तानाजी-सूर्याजी मालुसरे या पराक्रमी दोन बंधूंच्या महान कार्याचे सिहांवलोकन शौर्यदिनी करणे हेच इतिकर्तव्य ठरणारे आहे. शिवकाळाच्या इतिहासाबाबत अनेक गोष्टी नव्याने पुढे येत आहेत. नवनवीन ऐत्याहासिक कागदपत्रे आणि साधने उपलब्ध होत आहेत, त्यामुळे जुने संदर्भ कालबाह्य ठरत आहेत. वादविवाद होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि बदललेली शिक्षण पद्धती लक्षात घेऊन वाडवडिलांनी जपलेला इतिहास आपल्या पुढच्या पिढीकडे संक्रमित होत राहणे गरजेचे असते.

‘आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे’ किंवा ‘गड आला पण माझा सिंह गेला’ अशी इतिहासात झालेली नोंद म्हणजेच नरवीरांचा इतिहास नव्हे तर तानाजीवांच्या देदीप्यमान अद्वितीय तेजस्वी पराक्रमाची गाथा सांगणारा शाहीर तुलसीदासाने रचलेला शिवकाळातला पहिला पोवाडा आणि अशा इतर बऱ्याच प्रसंगांची नोंद इतिहासात आजही उपलब्ध आहे.

तानाजी क्षात्रकुलोत्पन्न ‘मल्ल’ राजवंशीय कुळातील होता. अकराव्या शतकातील आपत्काळात ‘मल्ल’ घराण्यातील एक शाखा कोकणात जावळी मुलुखात आश्रयास आली. त्या शाखेतील ‘नाईक’ हा तानाजीचा हुद्दा असावा. प्रतापगड युद्धानंतर किल्ले राजगड आल्यानंतर शिवरायांनी तानाजीला तावून-सुलाखून पहिल्यानंतर पायदळाच्या हजारी मनसबदार केले. मात्र त्याच्या हाताखाली एक हजार पायदळ जेधे, बादलांसारखे एकाच बिराजरीचे नव्हते, तसेच एकाच मुलुखातील नव्हते. मोहिमेप्रसंगी सैन्याबरोबर एक हजार हशमांचे मिश्र पायदळ सुद्धा दिले जाई. तानाजी मालुसरे स्वराज्यातील कधीही कोणत्याही वतनी सुभ्यावर नियुक्त नव्हता. शिवाजी राजांच्या स्वराज्यात प्रत्यक्ष वतने देण्याचा प्रघात नव्हता. त्याच्या आधी ‘सुभेदार’ हे उपपद लावले गेले. सुभेदार ह्या शब्दाचा अर्थ लष्करातील अधिकारी. सुभा म्हणजे प्रांत . पण तानाजीराव प्रांताधिकारी नव्हते. जेधे शकावलीत तानाजी मालुसरे यांच्या निधनानंतर नोंद आहे की,तान्हाजी मालुसरा राजश्रीकडील हशमांचा सुभेदार पडिला. कारण मराठी साम्रज्याच्या छोट्या बखरीत असा उल्लेख आहे की, तानाजीला जावळीच्या मोर्यांच्या मुलुखात कोणतेही वतन नव्हते. म्हणून तो शिवरायांच्या खड्या सैन्यात कायमस्वरूपी पगारी नोकरीत होता. म्हणूनच राजगडावरील सुवेळा माचीवर लष्करी सेनाधिकाऱ्याच्या वस्तीसमूहात त्याचे घर होते.

तानाजीराव मालुसऱ्यांचे पूर्वज तापी नदीच्या उतारावर सातपुड्याच्या जंगल काठावरचे मूळचे राहणारे लढवय्ये म्हणूनच दौलताबाद व नंतर अहमदनगर व वाईला आले. शेवटी ते पांचगणीजवळील गोडोलीला येऊन राहिले. तानाजी मालुसरे यांचे वडील काळोजी व त्यांचा भाऊ भोवरजी किंवा भोरजी हे गोडोलीचे रहिवाशी. या गोडोलीवर परक्यांची स्वारी नेहमीच येई. म्हणून काळोजी व भोरजी यांनी शिवाजी महाराजांचा पक्ष घेतला. आणि फत्तेखानाच्या स्वारीच्या वेळी त्याचे पारिपत्य करण्याची प्रतिज्ञा या दोन्ही भावांनी वाई जवळच्या आकोशी  व नालवाडी या गावी घेतली. आसगावच्या शिंगाण नावाच्या डोहाजवळ  झालेल्या सभेत या दोन्ही भावांनी विडे उचलले. वाईच्या सुभेदाराला ही बातमी लागली. त्याने गोडोलीवर अचानक हल्ला करून या दोन भावांचा बंदोबस्त करण्याचे ठरविले. आणि एकाएकी एके रात्री विजापूरकरांचा वाईचा सुभेदार त्या गावात आला. त्याने त्या गावावर अचानक हल्ला करून संपूर्ण गाव बेचिराख करून काळोजी,भोरजी व गोडोलीच्या शूरवीर गावकऱ्यांची कत्तल केली. तानाजीच्या आईने आपल्या दोन मुलांना घेऊन ब्रम्हारण्याचा रस्ता धरला. भोरजीचे मुलगे त्याच्या मामांकडे कोयना खोऱ्यांत फुरस गावाला गेले. तर तानाजी व सूर्याजी या बारा व दहा वर्षाच्या मुलांना घेऊन त्यांची मातोश्री आसऱ्यासाठी  प्रतापगडाच्याखाली करंजे गावातून उमरठला आली. तानाजीच्या मातोश्रीने उमरठ गावाजवळच डोंगरात एक घळ आहे, त्यात शिळ्या भाकऱ्या खाऊन तीन दिवस काढले. १०-१५ माणसे सहज बसतील अशी उत्तराभिमुख ही घळ अजूनही उमरठ लगतच्या डोंगराच्या उतारावर आहे. एक अबला आपल्या लहान मुलांना या ठिकाणी राहतेय हे गावकऱ्यांना जेव्हा कळले तेव्हा त्यांनी या माऊलीला गावात आणले. तोपर्यंत तिचा भाऊ शेलार त्यांचा शोध घेत उमरठला पोहोचला होता. शेलारमामाने त्यांच्या वाट्याला आलेले दुःख गावकऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी एक खोपट बांधून दिले आणि नाचणी,वरी पिकविण्यासाठी काही एकर वरकस जमीनही दिली. त्या उमरठ गावात  तानाजी-सूर्याजी आठ-दहा वर्षात गावचेच नव्हे तर साखर खोरे, कामथे खोरे, किनेश्वर खोरे, गोळेगणी खोरे, आणि शिवथर खोऱ्यातही प्रसिद्ध झाले होते. शरीर कमावण्यासाठी ते जोर जोडी, मल्लखांब करीत व दिवसभर काबाडकष्ट करीत. तरवार,भाला,बोथाटी चालवता चालवता तो समशेर बहाद्दर झाला. दांडपट्ट्याचे हात इतके सफाईने तो करी की पट्टा चालविणारे सराईत वेळ गडी त्याच्याकडे टकमक पाहत रहात. वेष पालटण्यातही तो तरबेज होता. कधी सरदारी  पोशाखात तो आपल्या जाडजूड काळ्या मिश्याना पीळ घालून बसला म्हणजे त्याचा थाट सरदारी दिसे. गोंधळी म्हणून गेला म्हणजे ओंगळ वंगाळ अडाणी दिसे. दोन्ही भाऊ शेती करीत अन लढाईचे डावपेच शिकत महाड प्रांतात मोठे प्रख्यात झाले.

बिरवाडीचा माल पाटील हा विजापूरच्या आदिलशाहीत एक जबरदस्त आसामी म्हणूनच मानला जात असे. हा मुलुख जरी जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांच्या राज्यात मोडत असला तरी त्या  मुलुखातील सर्व किल्ले आदिलशाहच्या प्रत्यक्ष ताब्यात होते. ऐन जिनसी शेतसारा व नक्त पैशातील शेतसारा मोऱ्याचे अधिकारी वसूल करीत. हे किल्लेदार मन मानेल तसा कारभार करीत असत. माल पाटलांनी याच्या तक्रारी अनेक वेळा केल्या तरी गडावरचा हवालदार मुसलमान असे व तो निशस्त्र प्रजेवर अनेक प्रकारे अन्याय  करीत असे. सय्यद कबीर हा लष्कर प्रमुख तर हवालदार रहितमत खान हा नरपशू अधिकारी होता. हे पादशाही लष्कर रायगडावरून ज्या गावाला जाई त्या गावावर मोठे संकट येई.  मोऱ्याचे तसेच मालपाटलाचे काही जमेना. तानाजीने नवतरुणांची एक प्रचंड सेना उभारली. हाक मारल्याबरोबर हत्यारबंद तरुण बाहेत पडत व त्यांचा बंदोबस्त करीत.

अफझुलखानाच्या स्वारीच्या वेळी तानाजीचे मावळे करंजे-देवळे व गोळेगणी – पैठणच्या खोऱ्यात सशस्त्र तयार होते. तानाजी प्रतापगडावरच भेटीचा सर्व प्रकार दिसेल अशा ठीकाणी बसलेला होता. खानाचा कोथळा बाहेर येऊन तो कोसळल्यानंतर  सय्यद बंडा भेटीच्या जागी तिरासारखा धावत गेल्यावर तानाजीही धावत गेला. संभाजी कावजी कोंढाळकर, जीवा महाला व तानाजीने खानाचा चेंदामेंदा  टाकला. खानाच्याच ताकदीचा तानाजी यावेळी धावत आला नसता  तर काय झाले असते हे कळण्यासारखे नाही असे कॅप्टन  मोडक यांनी प्रतापगडाचे युद्ध या पुस्तकात  आहे. तानाजी मालुसरे यांनी जावळी खोऱ्याच्या खाली असलेल्या या खोऱ्यात तरुणांची जी एकजूट केली त्यामुळे सन १५ जानेवारी १६५६ या दिवशी जावळीचा पाडाव झाला. त्यामुळे शिवरायांचे काम सोपे झाले,जावळी पूर्णपणे ताब्यात येऊन गुढ्या डोंगराच्या जुन्या गढीचे स्वरूप प्रतापगडात कऱण्यात आले.

तानाजीचा मुलगा रायबा (रायाजी) संभाजी महाराजांबरोबर असे. म्हाळसोजी या संताजी घोरपड्याच्या आजाबरोबरच्या सैन्यात तो नेहमी असे. तानाजीच्या मृत्यूनंतर सूर्याजी त्याच्या कलेवारासह वेल्हाची पेठ, ढोणीचे पाणी, बिरवाडी,भावे या गावावरून उमरठला आला आणि तेथेच राहिला. सूर्याजींचे तीन मुलगे होते. कान्होजी उमरठला राही. भोरजी कडोशी या महाबळेश्वरा पलीकडे असलेल्या गावी राहावयास गेला. तर नाईकजी  हा उमरठच्या पायथ्याशी असलेल्या साखर येथे राहू लागला. तानाजीच्या चुलत्याचा म्हणजे भोरजीचा वंश फुरुस या कोयना काठच्या गावाला आहे. त्याचप्रमाणे मालुसऱ्यांचे वंशज साखर, गोडोली, धाकटी वाकी,गावडी, किंवे,आंबेशिवथर, कसबे शिवथर, गोडवली,पारमाची, फुरुस  या गावात आजही राहतात.

सिंहगडावरील कोंढाणेश्वराच्या देवळाच्या खालच्या अंगास दक्षिणाभिमुख अमृतेश्वर मंदिर आहे. भैरव व भैरवीच्या दोन मूर्ती असून भैरवाच्या  चार हातात आयुधे आहेत. जवळच एक कुत्रा कोरलेला आहे. येथे यात्रा व मोठा उत्सव होत असे. त्याकाळी जवळ जवळ दोनशे रुपये खर्च येत असे. सन  १७६३ मध्ये भाऊसाहेब पेशव्यांची बायको पार्वतीबाई हिने अमृतेश्वराला सोन्याचा मुकुट दिला होता. सन  १७७७ मध्ये नवी मूर्ती बसवण्यात आली. या देवळाच्या मध्येच तानाजी मालुसरे यांची समाधी म्हणजे पूर्वी एक चौकोनी शिखराचे वृंदावन होते. त्यावर सन १९४० साली तानाजीचा अर्ध पुतळा व समाधीचे नूतनीकरण करण्यात आले. तानाजीच्या जुन्या तुळशीवृंदावनाची जागा ही तानाजीचा देह पडल्याची जागा म्हणजे वीरमरणाची जागा होय. त्याचे दहन उमरठला झाले त्याबाबतचा एक पोवाडा काही गोंधळी म्हणून दाखवितात. गडावरून पालखीतून तानाजीचा देह येल्याची पेठ, ढोणीचे पाणी व बिरवाडीतून सरळ साखर खोऱ्यात बोरज वरून उमरठला नेऊन शिवछत्रपती व जिजाबाईंच्या आगमनानंतर त्याला अग्नी देण्यात आला ही गोष्ट सत्य आहे. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या घेरेसरनाईकाच्या  सोबत केलेल्या बोलचालीचे वर्णन शिवकाळीन समकालीन शाहीर तुळशीदासच्या पोवाड्यातील एका चौकाच्या कडव्यात पुढील शब्द आहेत – धन्य ह्याची नारायणा । कोण तुमचे गाव । एवढे सांगावे आम्हाला । मी साखरेचा पाटील । गेलो होतो पुण्याला । मंडईच्या वाड्यात । गेलो होतो पट्टी लावायला । जात होतो घराला । तेथे वाघाने अडविला । तुमच्या आलो आश्रयाला ।। बाकीच्या वीरांचे देह दहन गडावर झाले असावे व म्हणूनच सतीचे दगड त्या जुन्या वृन्दावना सभोवार आहेत.सन १९३५ साली पुण्यात एक उत्सव मंडळही स्थापन झाले. व आजही ते आहे. या मंडळाने आता बांधलेली समाधी, अर्ध पुतळा व त्यावर मेघडंबरी व सभोवार कठडा या स्वरूपाची आहे. सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या देहसमाधी रुपात राज्याला एक नवी ऐतिहासिक भेट (Historical Gift) मिळाली आहे. पुणे महापालिकेच्या वतीने प्रसिद्ध  करण्यात आले आहे. पुरातत्व विभागाच्या मान्यतेनंतर साफसफाई आणि खोदकाम करत असताना ही समाधी उपस्थितांच्या हाती लागली. ही समाधी सापडल्यानंतर अलीकडे शिवप्रेमीनी आनंद व्यक्त केला आहे. वस्तूत: हा इतिहास यापूर्वीच पेणचे इतिहास संशोधक परशुराम दाते यांच्या ५० वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावरील पुस्तकात हे उल्लेखित आहे.

आज पोलादपूर तालुक्यात उमरठ येथे तानाजी मालुसरे व शेलारमामा यांची समाधी आणि लढाईच्या पावित्रातील ६ फूट उंचीचा भव्य पुतळा आहे. तर जवळच साखर येथे सूर्याजी मालुसरे यांची समाधी आहे. साखर येथील मालुसरे मंडळी पिढ्यान पिढ्या १९३० पासून उमरठ येथे माघ वद्य नवमीला जाऊन आजतागायत नतमस्तक होत शौर्यदिन साजरा करीत आली आहे.

इथेच सुभेदार तानाजीरावांचे चरित्र संपले….पण त्यापासून स्फूर्ती घेत गेल्या ३५० वर्षात अनेक असेच लढवय्ये आपल्या हिंदुस्थानात निर्माण झाले. सुभेदार तानाजीरावांच्या चरित्रात एव्हढी ताकद आहे कि, स्वातंत्रवीर सावरकरांनी देश पारतंत्र्यात असताना जनता पेटून उठावी यासाठी तानाजीच्या जीवनावर एक पोवाडा लिहिला, या पोवाड्यातून गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी हा देश पेटून उठेल हे लक्षात येताच इंग्रज सरकारने त्यावर बंदी आणली…..तानाजीरावांचे चरित्र कितीही गायिले तरी थोडेच. आणि त्यातील थोडे जरी आचरले तरी पुष्कळच.

रवींद्र मालुसरे

अध्यक्ष – मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०७


Back to top button
Don`t copy text!