सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) प्रथम स्मृतिदिन शिक्षण क्षेत्रातील एक तारा – अस्तास गेला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


समाजाच्या सर्वच क्षेत्रात विशेष करुन शिक्षण क्षेत्रात सातत्याने अलौकिक कार्य केलेल्या सुभाषकांना आपल्यातून जावून आज एक वर्ष झाले आहे. लौकिक अर्थाने ते आपल्यातून गेले असले तरी त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामुळे ते अनंतकाळापर्यंत आपल्यासोबत राहणार आहेत. काकांच्या पश्‍चात त्यांच्या सुविद्य पत्नी सविताकाकींनी श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदाचा भार स्वीकारुन एक प्रकारे काकांना व त्यांनी केलेल्या असामान्य कार्याला भावपूर्ण श्रद्धांजलीच वाहिली आहे.

आज काकांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या बद्दलच्या अनंत आठवणींनी मनात गर्दी केली आहे. गेली चार – पाच दशके त्यांच्या सहवासात राहिल्याने त्यांच्या अंतर्मनाशी व कार्यपद्धतीशी मी थोडाफार परिचीत झालो आहे. आज त्यांच्या स्मृतिला मन:पूर्वक अभिवादन करुन त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचा जनमानसाला परिचय करुन देण्याचा प्रयत्न करीत आहे.

पन्नास साठ वर्षांपूर्वी फलटण तालुक्यात शिक्षणाचा विस्तार म्हणावा तसा झाला नव्हता. बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता. शिक्षणापासून वंचित असलेल्या या घटकाला शैक्षणिकदृष्ट्या सक्षम आणि साक्षर करण्याच्या ध्येयाने कै.कर्मवीर आण्णांच्या प्रेरणेने आणि कै.यशवंतराव चव्हाण यांच्या आशीर्वादाने सुभाषकाकांच्या वडिलांनी कै.नामदेवराव बेडके तथा नानांनी, त्या खडतर काळात आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने श्रीराम एज्युकेशन संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्याकाळात बहुजन सामाजासाठी शाळा काढणे म्हणजे एक धाडसच होते.

कै.नानांनी काढलेल्या शाळांचा विस्तार करणे, इमारती, क्रिडांगणे उभी करणे या गोष्टी महाकठिण होत्या. अशा या बिकट परिस्थितीत विशिष्ट ध्येयाने प्रेरीत होऊन त्यांनी ही जबाबदारी पार पाडण्याचे ठरविले आणि अगदि कालपर्यंत त्यांनी या ध्येयाचा पाठपुरावा करुन ते तडीस नेले आहे. त्यांच्या या अफाट कार्यामुळे ‘श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा एक अविभाज्य भाग म्हणजे सुभाषकाका’ असे समीकरण झाले आहे.

त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली त्यावेळी समाजातील तळागाळतल्यांसाठी फारशा शैक्षणिक सुविधा उपलब्ध नव्हत्या. अशा या दुर्लक्षीत समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून त्यांनी आपल्या संस्थेच्या सर्व शाखांचा सर्वार्थाने विस्तार केला. कोणाचेही आर्थिक पाठबळ नसताना पण सामान्यांच्या जनाधारावर त्यांनी हे कार्य यशस्वीरित्या पार पाडले.

कै.नानांनी उभारलेल्या या संस्थेची संख्यात्मक व गुणात्मक वाढ त्यांनी केली. शिक्षणाने समाजात परिवर्तन होते, माणूस विचारशील बनतो, त्यामुळे शिक्षणाला पर्याय नाही या विचारावर ते ठाम होते. शिक्षणासह मूल्यविचारांबाबत त्यांनी कधीच तडजोड केली नाही. त्यामुळे संस्थेच्या सर्व शाखा आजही बदलत्या काळाबरोबर नेहमीच प्रगतशील आणि ज्ञानाबद्दल अद्ययावत राहिल्या आहेत. शाळांच्या इमारती, विद्यार्थ्यांच्या प्राथमिक गरजा, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यासाठी कोणाचेही आर्थिक पाठबळ नसल्याने त्यांनी स्वत:ची वैयक्तिक मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवली होती. त्यागाची परिसिमा यापेक्षा आणखीन काय असू शकते?

सातारा जिल्ह्याच्या नकाशावर शिक्षण क्षेत्रात श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते; याचे श्रेय निर्विवाद काकांकडे जाते. शिक्षणक्षेत्रात शिक्षक व विद्यार्थी हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे असल्याने विद्यार्थ्यांबद्दल त्यांना आत्यंतिक जिव्हाळा व अभिमान होता. तर शिक्षकांबद्दल आपुलकी, प्रेम व अपेक्षाही होत्या. शिक्षकांना त्यांनी ध्येयवादाचा मार्ग दाखवला आणि हाच ध्येयवाद शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजविला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती. दुसर्‍यांना सतत प्रोत्साहन देणे, त्यांना उद्यमशील बनवणे हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ठ्य होते.

विद्यार्थी हा देशाचा एक चांगला सुसंस्कारित नागरिक झाला पाहिजे; हा विचार त्यांनी आपल्या संस्थेच्या सर्व शिक्षक वर्गात, सेवकांत रुजविला आहे. शिक्षणक्षेत्रातील एक मानदंड, आधुनिक विचारांचा पुरस्कर्ता, नवीन शैक्षणिक धोरणांचा पाठीराखा, एक सच्चा समाजसेवक म्हणून लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. संस्थेतील त्यांच्या सहकार्‍यांबद्दल त्यांच्या मनी आदराची भावना आहे. प्रत्येक विषयाच्या खोलवर जावून त्या विषयाचा मागोबा घेण्याच्या त्यांच्या चौकस स्वभावामुळे समाजाच्या सर्व क्षेत्रात त्यांचा मित्रवर्ग विखुरलेला आहे.

स्वत:च्या कुटूंबाबद्दल ते अत्यंत भावूक आहेत. कै.नानांनी लावलेल्या शिक्षणरुपी रोपट्याचे अनंत अडचणींवर मात करीत त्यांनी विशाल वृक्षात रुपांतर केले आहे. तर त्यांच्या दोन्ही मुलांनी या विशाल वृक्षाचे वटवृक्षात रुपांतर केले आहे. थोरले चिरंजीव श्री. सचिन यांनी आपले आजोबा कै.नाना व वडिल कै.सुभाषकाका यांच्याप्रमाणे स्वत:चे जीवन शिक्षणासाठी वाहून घेतले आहे. या त्यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी सौ.ज्योतीताई यांचाही हातभार आहे आणि धाकटे चिरंजीव श्री.महेंद्र यांनी शिक्षणाबरोबर राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवेची पताका हाती घेतली आहे. श्री. सचिन यांच्या कार्याचा आवाका पाहून एका मान्यवर संस्थेने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना पी.एचडी. ही पदवी प्रदान केली आहे. तर चालू वर्षी संस्थेच्या कार्याचा विस्तार आणि प्रगती पाहून महाराष्ट्र शासनाने संस्थेस डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन संस्थेच्या कार्याचा गौरव केला आहे. तर महेंद्र यांना विभागीय व राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेस पक्षात जबाबदारीची पदे मिळालेली आहेत. काँग्रेस पक्षाचे एक रचनात्मक कार्य करणारे, उत्कृष्ट संघटक, क्रियाशील खंदे नेते म्हणून ते पक्षात प्रसिद्ध आहेत.

काकांनी आयुष्यभर जे शैक्षणिक कार्य केले त्यात त्यांच्या पत्नी सविताकाकी सर्वकाळ त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काकांना जे उत्तुंग यश मिळाले, वेळोवेळी जो मानसन्मान मिळाला त्या यशात काकींचा सिंहाचा वाटा आहे.

सर्व नातेबंधनात नाजूक आणि हळवे नाते म्हणजे नातवंडे आणि काकाही आपल्या दोन्ही लाडक्या नातवंडांबद्दल हळवे होते.
अशा या दूरदर्शी व बहुआयामी व्यक्तीमत्त्व असलेल्या काकांचे शैक्षणिक कार्य आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आज त्यांच्या प्रथम स्मृतीदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या कार्याचा पाठपुरावा करणे हीच त्यांना खरी आदरांजली होईल. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन !

– श्री. सतिश पटवर्धन,

सेवानिवृत्त मुख्याध्यापक, यशवंतराव चव्हाण हायस्कूल, फलटण.


Back to top button
Don`t copy text!