दैनिक स्थैर्य | दि. १७ जुलै २०२३ | फलटण |
फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक ऐक्यचे दुधेबावी प्रतिनिधी सुभाष सोनवलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी साप्ताहिक स्वराजचे सचिन निंबाळकर, सचिवपदी दै. सकाळचे आसू प्रतिनिधी अशोक सस्ते, तर खजिनदारपदी दै. सकाळचे कोळकी प्रतिनिधी संजय जामदार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
कोरोना महामारी कालावधीत संघटनेचे खंडित झालेले सर्व उपक्रम यापुढे सुरू ठेवण्यासाठी आणि नवीन कार्यकारिणीची निवड करण्याच्या उद्देशाने फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाची बैठक शिवसंदेशकार कॉम्रेड माजी आमदार हरिभाऊ निंबाळकर पत्रकार भवन फलटण येथे रविवारी झाली. बैठकीस ग्रामीण पत्रकार संघाचे पुणे विभागीय संपर्कप्रमुख श्री. श्रीरंग पवार, जिल्हाध्यक्ष श्री. विनायक शिंदे, संघाचे ज्येष्ठ सदस्य तथा माजी अध्यक्ष राजेंद्र भागवत, माजी अध्यक्ष नानासाहेब मुळीक, प्रदीप चव्हाण, आनंद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्व सदस्यांची एकजूट आणि त्यांच्या सहकार्याने संघटनेच्या विविध उपक्रमांची पुढील वाटचाल अविरत सुरू ठेवण्यासाठी खर्या अर्थाने बैठकीचे आयोजन केले. त्यास आपण सर्व सदस्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे आपण संघटनेचे विविध उपक्रम मोठ्या जोमाने सुरू ठेवाल, यात कोणतीही शंका नाही. आम्हा सर्व ज्येष्ठ सदस्यांचे आताच्या नवीन कार्यकारिणीला सर्वोतोपरी सहकार्य राहील, असे सांगून श्रीरंग पवार यांनी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रारंभी शिवसंदेशकार कै. हरिभाऊ निंबाळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. आनंद पवार यांनी प्रास्तविक केले. प्रदीप चव्हाण यांनी आभार मानले.