दैनिक स्थैर्य । दि. ०६ सप्टेंबर २०२२ । सातारा । येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज मराठी विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी येथील तामजाईनगर करंजे परिसरातील महानुभाव मठास अभ्यास करण्यासाठी भेट दिली. या वेळी मठाचे महंत सातारकर बाबा यांनी विद्यार्थ्यांना महानुभाव संप्रदायाची माहिती दिली. महानुभाव पंथीय यांचे तत्वज्ञान ,आचारसंहिता .महानुभाव पंथाचे वाड्मय , पंच परमेश्वर संकल्पना,चक्रधर स्वामींचे व्यक्तिमत्व व त्यांची समतावादी दृष्टी ,महानुभाव पंथात स्त्रियांना असलेले ज्ञान, लीळाचरित्र , गोविन्द्प्रभू चरित्र ,पंथीय यांचे गद्य ,पद्य वाड्मय या विषयी त्यांनी सोप्या भाषेत विवेचन केले .ते म्हणाले की हे तत्वज्ञान अनुभवाचा भाग आहे,अनुभवाने ब्रम्हज्ञान घेता येते. स्मरण भक्ती हे संप्रदायाचे वैशिष्ट्य असल्याचे सांगितले येथील सुरेंद्र बिडकर दादा यांनी मराठी विभागास महानुभाव मठाची स्मरणिका भेट दिल्या . सत्ता ,संपत्ती या पासून दूर होऊन विरक्तपणे परमेश्वराचे स्मरण पंथात केले जाते .गुरूंचे महत्व या पंथात फार पूर्वीपासून असून गुरुदृष्टी ,गुरु वचन हे प्रमाण मानले जाते.त्यांनीही पंथीय तत्त्वज्ञाचा संक्षिप्त परिचय करून दिला. या वेळी मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन मठातील महंत व साधक
यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी विभागातील डॉ.कांचन नलवडे, डॉ.विद्या नावडकर, डॉ.संजयकुमार सरगडे,प्रा.प्रियांका कुंभार ,तसेच मराठी विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.