मुधोजी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचा अभ्यास दौरा संपन्न


दैनिक स्थैर्य | दि. २३ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ रोजी बी.ए.-१,२,३ या वर्गांच्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय अभ्यास दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. या दौर्‍याद्वारे विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत प्रशासन, ऐतिहासिक ठिकाणांचे महत्त्व आणि ग्रामीण भागातील शिक्षणप्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.

संतोषगड किल्ल्याचा ऐतिहासिक अभ्यास

अभ्यास दौर्‍याची सुरुवात संतोषगड किल्ल्याच्या अभ्यासाने झाली. हा किल्ला शंभू महादेव डोंगररांगेत असून, त्याला ऐतिहासिक आणि संरक्षणात्मक महत्त्व आहे. प्रा. गिरीश पवार यांनी विद्यार्थ्यांना किल्ल्याचा इतिहास, स्थापत्यशास्त्र आणि त्याच्या संरक्षणात्मक वैशिष्ट्यांविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी किल्ल्याचा भौगोलिक आणि ऐतिहासिक दृष्टीकोनातून अभ्यास केला.

ताथवडा आणि वाठार निंबाळकर ग्रामपंचायतीस भेट

यानंतर विद्यार्थ्यांनी ताथवडा आणि वाठार निंबाळकर ग्रामपंचायतींना भेट देऊन ग्रामपंचायत प्रशासन, स्थानिक विकास योजना आणि निधी वाटप याविषयी माहिती घेतली. ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्य, ग्रामसभा, लोकसहभाग आणि विविध ग्रामविकास योजनांची अंमलबजावणी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ग्रामीण शिक्षणप्रणालीचा अभ्यास

ग्रामपंचायत दौर्‍यानंतर विद्यार्थ्यांनी स्थानिक प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना भेट दिली. विद्यार्थ्यांनी शिक्षक व शालेय व्यवस्थापनाशी संवाद साधून ग्रामीण शिक्षणातील संधी व अडचणी जाणून घेतल्या. सरकारी आणि खाजगी शाळांतील शिक्षणपद्धतींचे तुलनात्मक विश्लेषणही करण्यात आले.

निंबाळकर वाडा भेट आणि वनभोजन

दौर्‍याच्या अखेरीस विद्यार्थ्यांनी इतिहासप्रसिद्ध निंबाळकर वाड्यास भेट दिली. मराठा इतिहासातील निंबाळकर घराण्याचे योगदान, वाड्याचे स्थापत्य आणि त्याच्या ऐतिहासिक महत्त्वाचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी वनभोजनाचा आनंद घेत अनुभवांची देवाणघेवाण केली.

या अभ्यास दौर्‍यात ६२ विद्यार्थी सहभागी झाले होते. मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. एच. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विभागातील प्रा. गिरीश पवार यांनी संयोजन केले. तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. टी. पी. शिंदे यांच्या संकल्पनेतून हा अभ्यास दौरा पूर्ण झाला. प्रा. प्रियांका शिंदे यांनी विशेष सहकार्य केले.

या शैक्षणिक दौर्‍यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेण्याची संधी मिळाली. अशा प्रकारचे अभ्यास दौरे भविष्यात अधिक प्रमाणात आयोजित करण्याची गरज असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!