संभाजी ब्रिगेडचा सह्याद्री फार्मस् अभ्यास दौरा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २७ जुलै २०२४ | नाशिक |
सह्याद्री फार्म नाशिक येथे संभाजी ब्रिगेडचा अभ्यास दौरा पार पडला. पहिल्या दिवशी पदाधिकारी बैठक सत्राचे उद्घाटन राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांना वंदन करून झाले.

संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना संभाजी ब्रिगेडची अर्थकारणाची चळवळ उलगडून सांगत, जग ही खुली बाजारपेठ आहे, त्यामुळे युवाशक्तीसाठी ही वेळ आर्थिक सक्षमीकरण करून उद्योग-व्यवसायाची घडी बसवण्याची व स्वतःला सिद्ध करण्याची असल्याचे नमूद केले. कुठल्याही भावनिक आंदोलनात सहभागी न होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी पदाधिकार्‍यांना केले.

कार्याध्यक्ष सुधीर भोसले व महासचिव सुभाष बोरकर यांनी संघटनात्मक बांधणी या विषयावर चर्चा करताना जिल्हानिहाय संघटनात्मक बांधणी व त्यातून युवाशक्तीचे आर्थिक सक्षमीकरण व संघटन साध्य करण्याचे आवाहन केले. जागतिकीकरण व उदारीकरण यातून निर्माण झालेल्या संधी युवशक्तीने हेरून समर्पित भावनेने स्वतःचा उत्कर्ष करावा, असे आवाहन करत त्यास संभाजी ब्रिगेड पाठबळ देईल, असे यावेळी नमूद करण्यात आले.

प्रदेश संघटक अजयसिंह सावंत खास, प्रदीप कणसे, सचिन सावंत देसाई यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

मुंबई येथे होणार्‍या संभाजी ब्रिगेड अधिवेशनाबाबत नियोजनात्मक चर्चा यावेळी करण्यात आली.

संभाजी ब्रिगेडचे शंभूसिंग पृथ्वीराज नाईक निंबाळकर यांनी आभार मानताना संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना कुस बदलतेय, त्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे व समाज व कुटुंबव्यवस्था व पर्यायाने देश व राज्य आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी संभाजी ब्रिगेड मैलाचा दगड ठरेल असे नमूद केले.

दुसर्‍या सत्रात व्यवसाय समुपदेशक सागर पाटील यांनी ‘संभाजी ब्रिगेड व डिजिटल प्लॅटफॉर्म’ या विषयावर मार्गदर्शन करताना बदललेल्या तंत्रज्ञानाच्या युगात संघटनात्मक पातळीवर देखील तंत्रज्ञान कसे परिणामकारक ठरू शकते, यावर मार्गदर्शन केले.

दुसर्‍या दिवशी सामूहिक संचलन पार पडल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत जिजाऊ शिवरायांना वंदन करण्यात आले. सह्याद्री फार्मच्या शेतकर्‍यांच्या आर्थिक सक्षमीकरण चळवळीवर पाणी फाउंडेशनने बनवलेली चित्रफीत दाखवण्यात आली. यावेळी सह्याद्री फार्मचे चेअरमन विलास शिंदे व पोल्ट्री उद्योजक दादासाहेब गांगुर्डे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रास्ताविक करताना प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या चळवळीवर प्रकाश टाकत सह्याद्री फार्मच्या वाटचालीचे कौतुक केले व या दोनदिवसीय शिबीरामुळे उपस्थित पदाधिकार्‍यांना नवी दिशा व नवा विचार मिळण्यास मदत होईल, असे नमूद केले.

विलास शिंदे यांनी सह्याद्री फार्मचा प्रवास उलगडताना महाविद्यालयीन जीवनातील चळवळीचे जीवन, त्यामुळे झालेले नुकसान व व्यावसायिक जीवनाच्या सुरुवातीला आलेल्या अपयशाने न खचता सातत्यपूर्ण कामातून सह्याद्री फार्मचे स्वप्न साकार करण्याचा प्रवास सांगितला. संभाजी ब्रिगेडची आर्थिक सक्षमीकरणाची चळवळ व त्याची कालानुरूप आवश्यकता याचेही त्यांनी कौतुक करत भावनिक समाजकारणातून बाहेर पडण्याचे आवाहन केले.

पोल्ट्री उद्योजक दादासाहेब गांगुर्डे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सचोटीने व प्रामाणिकपणे व्यवसाय केल्यास यश निश्चित मिळते, त्यासाठी सातत्यपूर्ण काम करावे असे आवाहन केले. सफर सह्याद्रीची अंतर्गत सर्व पदाधिकार्‍यांना सह्याद्री फार्मच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती पाहणी दौरा करून यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गायधनी यांनी केले व आभार रवींद्र दातीर यांनी मानले.

महाराष्ट्रातील संभाजी ब्रिगेड प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने या अभ्यास दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते.


Back to top button
Don`t copy text!